संरक्षणावरील खर्चात सर्वांत पुढे कोण?; भारत तिसऱ्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 06:59 AM2022-04-26T06:59:32+5:302022-04-26T06:59:49+5:30
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या अहवालानुसार २०२१ मध्ये जागतिक लष्करी खर्चात ०.७ टक्के वाढ झाली.
लष्करी सामर्थ्यामुळे देश सुरक्षित राहतो. वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही. त्यामुळेच प्रत्येक देश आपल्या संरक्षणावरील खर्चात सातत्याने वाढ करत असतो. गेल्या काही वर्षांत या खर्चात लक्षणीय वाढ झाली असून अमेरिका त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा या यादीत तिसरा क्रमांक लागतो.
जागतिक लष्करी खर्चात वाढ
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या अहवालानुसार २०२१ मध्ये जागतिक लष्करी खर्चात ०.७ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी जगभरात लष्करावर एकूण २ लाख कोटींहून अधिक रुपये खर्च झाला.लष्करावर खर्च करण्यात अमेरिका, चीन, भारत, ब्रिटन
आणि रशिया या पाच देशांचा मोठा वाटा आहे.
भारताच्या खर्चात वाढ
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हान लक्षात घेत भारताने गेल्या वर्षी संरक्षणावरील खर्चात वाढ केली. भारताने गेल्या वर्षी संरक्षणावर ५ लाख ८७ हजार कोटी रुपये खर्च केले. संरक्षण साहित्यात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारताने पाऊल टाकले असून त्यावरील खर्चातही वाढ केली.
युक्रेन युद्धामुळे रशियावर ताण
युक्रेनवर चढाई केल्यामुळे रशियन संरक्षणसिद्धतेवर ताण आला आहे. युद्धाला सुरुवात झाल्यापासून रशियाने सैन्यावरील खर्चात वाढ केली असून आतापर्यंत २० अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. या आकस्मिक खर्चामुळे रशियाचे संरक्षणावरील अंदाजपत्रक कोलमडले आहे.