हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 02:27 PM2024-09-21T14:27:31+5:302024-09-21T14:28:46+5:30
पेजर स्फोटात तिच्या कंपनीचे नाव समोर आल्यानंतर मीडिया तिचा शोध घेत आहे तेव्हापासून ती गायब आहे.
Lebanon Pager Blast: ती सात भाषा बोलते, पेंटर आहे. फिजिक्समध्ये पीएचडी आहे, ती एका कंपनीची CEO ही आहे. तीन-चार वर्षांपासून तिला कुणी ओळखतही नव्हते पण गेल्या दोन दिवसांत ती अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र तिला ही प्रसिद्धी तिच्या कामामुळे नाही तर लेबनॉनमधील पेजर आणि वॉकी-टॉकी स्फोटाशी जोडलेल्या नावामुळे मिळत आहे.
बुडापेस्टमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहणारी BAC कंसल्टिंग इतालवी हंगेरियन सीईओ आणि मालिक क्रिस्टियाना बार्सोनी आर्किडियाकोना हिनं म्हटलंय की, आम्ही ते स्फोटक पेजर बनवले नाहीत ज्यात लेबनानमध्ये १२ मृत्यू आणि ३ हजाराहून अधिक जखमी झालेत. तसे पेजर आम्ही बनवत नाही. आमचं तैवानी कंपनी पेजर उत्पादन कंपनीशी टायअप आहे. आम्ही केवळ पेजरचं डिझाईन बनवतो असं स्पष्टीकरण तिने दिले.
स्फोटानंतर भूमिगत
पेजर स्फोटात तिच्या कंपनीचे नाव समोर आल्यानंतर मीडिया तिचा शोध घेत आहे. तेव्हापासून ती सार्वजनिक ठिकाणी दिसलेली नाही. शेजाऱ्यांनीही तिला पाहिले नसल्याचं सांगितले. बार्सोनी-आर्किडियाकोनोने रॉयटर्सच्या कॉल आणि ईमेलला प्रतिसाद दिला नाही. जेव्हा रॉयटर्सने बुडापेस्टच्या डाउनटाउनमध्ये तिच्या खासगी पत्त्याला भेट दिली तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तिचा बुडापेस्टमधील एका आलिशान जुन्या इमारतीत फ्लॅट आहे, जो आठवड्याच्या सुरुवातीला खुला होता, पण आता बंद आहे.
बीएसी ही फक्त एक व्यावसायिक मध्यस्थ कंपनी
हंगेरियन सरकारने बुधवारी सांगितले की, बीएसी कन्सल्टिंग ही एक "व्यापार मध्यस्थ कंपनी" आहे ज्याची देशात कोणतीही उत्पादन साइट नाही आणि पेजर कधीही हंगेरीला आले नव्हते. जेव्हा माध्यमांनी तिच्या ओळखीच्या आणि माजी सहकाऱ्यांशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितले की, ती एक प्रभावी बुद्धिमत्ता असलेली महिला आहे.
दरम्यान, युनायटेड नेशन्समधील माजी मानवतावादी प्रशासक किलियन क्लेनश्मिट यांनी २०१९ मध्ये ट्यूनिशियामध्ये लिबियाच्या लोकांना हायड्रोपोनिक्स, आयटी आणि व्यवसाय विकास यासारख्या विषयांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी डच-अनुदानित कार्यक्रम चालवण्यासाठी बार्सोनी-आर्किडियाकोनोची नियुक्ती केली होती. ते आता तिला कामावर घेणे ही मोठी ‘चूक’ मानतात. बार्सोनी-आर्किडियाकोनोच्या एका वर्गमित्राने सांगितले की लहानपणी ती पूर्व सिसिलीमधील कॅटानियाजवळील सांता वेनेरिना येथे राहत होती. तिचे वडील कामगार होते, तर आई गृहिणी होती. तिने जवळच्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. २००० च्या दशकाच्या सुरुवातीस तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे भौतिकशास्त्रात पीएचडी प्राप्त केली, परंतु वैज्ञानिक करियरचा पाठपुरावा केला नाही. त्यानंतर तिने कोणतेही वैज्ञानिक काम केलेले नाही.