रशियन ‘लेडी जासूस’च्या मागावर अमेरिका; ‘गुप्तहेर’ महिला सध्या खूप चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 07:29 AM2022-03-17T07:29:12+5:302022-03-17T07:29:27+5:30
अमेरिकेचे केवळ सिक्रेटस्च तिनं रशियाला पुरवले नाहीत, तर अमेरिकेचे अनेक नेते, उद्योजक यांना रशियाच्या गळाला लावण्याचं काम एलेनानं केलं, असं आता सरकारच्या वतीनं थेट न्यायालयातही सांगण्यात आलं आहे.
गुप्तहेर, जासूस यांच्या कथा वाचायला, ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात. कारण त्यातलं रहस्य प्रत्येकाला नेहमीच खिळवून ठेवतं. त्यामुळंच या घटना, कथा सत्य असोत किंवा कल्पित, त्यावरचे चित्रपटही प्रेक्षकांच्या मनाची घट्ट पकड घेतात...या घटना जर सत्य असतील, तर त्याविषयी लोकांना अधिकच कुतूहल असतं. रशियाची अशीच एक ‘गुप्तहेर’ महिला सध्या खूप चर्चेत आहे.
कोण आहे ही गुप्तहेर महिला? तिचं नाव आहे एलेना ब्रॅन्सन. ६१ वर्षांची ही महिला सध्या अमेरिकेच्या डोळ्यांत मोठ्या प्रमाणात सलते आहे. अर्थातच त्याला कारण आहे, सध्या सुरू असलेली रशियाची हडेलहप्पी, युक्रेनवर रशियानं केलेला हल्ला आणि अमेरिका- रशियाचे आत्यंतिक बिघडलेले संबंध...
एलेनाला ‘रशियन एजंट’ म्हणून संबोधलं जात असलं तरी अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांचं नागरिकत्व एलेनाकडं आहे. २०१२ मध्ये तिनं न्यूयॉर्कमध्ये रशियन सेंटर सुरू केलं आणि ‘आय लव रशिया’ ही मोहीम प्रदीर्घ काळ चालवली. मात्र, अमेरिकेत हे रशियन सेंटर चालवण्यासाठी एलेनाला लक्षावधी डॉलर्सची पुंजी रशियानं पुरवल्याचा आरोप आहे. हा आरोपही तसा जुना आहे. अमेरिकेत राहून रशियासाठी ‘काम’ करत असल्याचे अनेक आरोप तिच्यावर लावण्यात आले आहेत.
अमेरिकेचे केवळ सिक्रेटस्च तिनं रशियाला पुरवले नाहीत, तर अमेरिकेचे अनेक नेते, उद्योजक यांना रशियाच्या गळाला लावण्याचं काम एलेनानं केलं, असं आता सरकारच्या वतीनं थेट न्यायालयातही सांगण्यात आलं आहे. रशियानं युद्धखोरी सुरू केल्यानंतर त्यांच्यावर निर्बंध आणण्याचे आणि येनकेन प्रकारेण रशियाला कोंडीत पकडण्याचे सारे मार्ग आता अमेरिका अवलंबत आहे. याच प्रयत्नांचा आणि धोरणांचा भाग म्हणून एलेनावरील चौकशीचा फास अधिकच आवळण्यात आला आहे.
एलेनानं न्यूयॉर्कमध्ये जे रशियन केंद्र सुरू केलं, त्या माध्यमातून विशेषत: अमेरिकन तरुणांमध्ये रशियाविषयी आकर्षण, आत्मीयता निर्माण होईल, रशियन इतिहास आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार तसंच अमेरिकेत रशियाची पाळंमुळं रुजवण्याचं काम तिनं केलं, असे अनेक आरोप एलेनावर ठेवण्यात आले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि रशियाच्या अनेक उच्चपदस्थमंत्री, उद्योजकांशी एलेनाचा थेट संपर्क आहे. एवढंच नाही, अमेरिकेतील मंत्री आणि पॉलिसी मेकर्स यांच्याशीही तिची ऊठबस असल्याचं म्हटलं जातंय. दोन्ही देशांतल्या बड्या लोकांशी असलेल्या, वाढवलेल्या परिचयाचा उपयोग तिनं रशियाच्या फायद्यासाठी केला, म्हणून अमेरिका तिच्यावर डोळे वटारून पाहत आहे.
अमेरिकेतील एकूण सहा मोठ्या गुन्हेगारी प्रकरणांशी एलेनाचा संबंध जोडला जात आहे. व्हिसा फसवणुकीच्या कटातही तिचा सहभाग असल्याचं म्हटलं जातंय. आपण ‘रशियन एजंट’ असल्याचं तिनं कायम दडवून ठेवलं आणि मोठमोठ्या पदावरील अधिकाऱ्यांच्या मदतीनं हेरगिरी आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांत भाग घेतल्याचं आरोपपत्र एलेनावर ठेवण्यात आलं आहे. अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी तर सांगितलं, एलेनाचं अनेक देशांच्या उच्चपदस्थांशी थेट संबंध आहेत. याचाच उपयोग करून तिनं हवाई बेटांवर असलेल्या रशियन किल्ल्याचं नाव बदलू नये यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यासाठी रशियाच्या ‘सहली’ आयोजित केल्या. अमेरिकन अधिकऱ्यांनाही तिनं जाळ्यात ओढलं आणि प्रसंगी आपल्या स्त्रीत्वाचाही उपयोग केला, रशियासाठी लॉबिंग केलं. त्यासाठी कायदेशीर, बेकायदेशीर, नैतिक, अनैतिक साऱ्या मार्गांचा वापर केला.
अमेरिकन सरकार आपल्याला केव्हाही अटक करेल या भीतीनं एलेना २०२० मध्ये अमेरिकेतून ‘गायब’ झाली आणि पुन्हा रशियामध्ये गेली; पण आपण कोणताही गुन्हा केला नाही, आपण कोणाचेही एजंट नाही आणि कोणतेही गफले कधीच केले नाहीत, असं एलेनाचं म्हणणं आहे. अमेरिकन चौकशी अधिकारी मात्र एलेनावर आरोपांच्या फैरींवर फैरी झाडताहेत. अमेरिकन आणि रशियन उच्चपदस्थांच्या बैठका आयोजित करणं, त्या माध्यमातून ‘राजकारण’, कटकारस्थान रचणं, ‘रशियन फोरम’ चालवणं.. अशा ‘बातम्या’ आहेत. हे काम करण्यासाठी लाखो डॉलर्सचा मलिदाही रशियानं एलेनाला वेळोवेळी पुरवला असल्याचा पुरावा आपल्याकडं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे, एलेनाला रशियन सरकारनं ऑगस्ट २०१३ ते नोव्हेंबर २०१९ या काळात तब्बल दोन लाख डॉलर्सची दिले, हे आम्ही खात्रीनं सांगू शकतो.