कोण आहेत जनरल वकार? ज्यांच्या हातात आलंय बांगलादेशचं नेतृत्व, शेख हसीना यांच्याशी आहे नातं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 05:46 PM2024-08-05T17:46:31+5:302024-08-05T17:52:43+5:30
Bangladesh protests Update: बांगलादेशची सत्ता लष्कराने ताब्यात घेतल्यानंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार उज जमां (General Waqar UZ Zaman) यांचं नाव चर्चेत आलं आहे. हे वकार उज जमां कोण आहेत आणि त्यांचं सत्तेवरून पायउतार झालेल्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी काय नातं आहे, याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.
आरक्षणावरून हिंसाचाराचा आगडोंब उसळून त्यात शेकडो लोकांचा बळी गेल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी पदाचा राजीनामा देत देश सोडला होता. त्यानंतर आता बांगलादेशचं नेतृत्व लष्कराने ताब्यात घेतलं आहे. तसेच हंगामी सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. बांगलादेशची सत्ता लष्कराने ताब्यात घेतल्यानंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार उज जमां यांचं नाव चर्चेत आलं आहे. हे वकार उज जमां कोण आहेत आणि त्यांचं सत्तेवरून पायउतार झालेल्या पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी काय नातं आहे, याची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.
शेख हसिना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशची सर्व सत्तासूत्रे लष्करप्रमुख वकार उज जमां यांच्या ताब्यात आली आहेत. १६ सप्टेंबर १९६६ रोजी जन्मलेले वकार हे बांगलादेशच्या लष्करातील ४ स्टार जनरल आहेत. तसेच २३ जून २९२४ पासून ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत. या पदावर येण्यापूर्वी ते बांगलादेशच्या लष्करामध्ये चीफ ऑफ जनरल स्टाफ होते. तत्पूर्वी आर्म्फ फोर्सेस डिव्हिजनचे प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर होते.
वकार उज जमां हे २० डिसेंबर १९८५ रोजी बांगलादेशच्या लष्करी अकादमीत प्रवेश घेतला होता. त्यानंतर ते ईस्ट बंगाल रेजिमेंटमध्ये दाखल झाले. लष्करामध्ये सेवा देत असताना त्यांनी नॉन कमिशंड ऑफिसर्स अकादमी, स्कूल ऑफ इन्फ्रंट्री अँड टॅक्सिस यासारख्या संस्थांमध्ये शिकवण्याचं काम केलं. त्याशिवाय संयुक्त राष्ट्रांनी लायबेरिया आणि अंगोला येथे पाठवलेल्या सैन्यामधील बांगलादेशच्या तुकडीचं नेतृत्व केलं. या काळात लष्करामध्ये त्यांची सातत्याने बढती होत गेली. वकार उज जमां यांना ३० नोव्हेंबर २०२० रोजी लेफ्टिनंट जनरल पदावर नियुक्त करण्यात आलं. पुढे ते चीफ ञफ आर्मी स्टाफ या पदापर्यंत पोहोचले.
बांगलादेशमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जनरल वकार उज जमा यांच्या पत्नीचं नाव साराहनाज कामालिका रहमान आहे. त्या बांगलादेशचे माजी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मुस्तफिजूर रहमान यांच्या कन्या आहे. जनरल मुस्तफिजूर रहमान नात्याने शेख हसिना यांचे काका लागतात. या नात्याने साराहनाज कामालिका रहमान त्यांची चुलत बहीण आहे. तर त्यांचे पती हे जनरल वकार हे शेख हसिना यांचे नात्याने भावोजी लागतात.