कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 03:26 PM2024-11-07T15:26:57+5:302024-11-07T15:27:46+5:30
Kashyap 'Kash' Patel : डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू समजले जाणारे कश्यप 'काश' पटेल यांची सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
Kashyap 'Kash' Patel : वॉशिंग्टन - साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. ४ वर्षांच्या कालवधीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान होणार असून, यावेळी त्यांना ५० राज्यांतील ५३८ जागांपैकी २९५ जागांवर विजय मिळाला आहे.
लवकरच डोनाल्ड ट्रम्प हे आपले नवीन मंत्रिमंडळ आणि इतर संस्थांचे प्रमुख देखील निवडतील. याबाबत विविध लोकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. या नावांमध्ये भारतीय वंशाच्या कश्यप 'काश' पटेल या नावाची बरीच चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू समजले जाणारे कश्यप 'काश' पटेल यांची सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच CIA ही अमेरिकेतील सर्वात मोठी गुप्तचर संस्था आहे. जी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावते. वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प हे कश्यप 'काश' पटेल यांना सीआयए प्रमुखपदाची जबाबदारी देऊ शकतात. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी सीआयए प्रमुखपदी नियुक्तीसाठी कश्यप 'काश' पटेल यांचे नाव पुढे केले आहे.
भारतीय वंशाचे कश्यप काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जातात. १९८० मध्ये न्यूयॉर्क येथील गार्डन सिटीमध्ये जन्मलेल्या कश्यप 'काश' पटेल यांचे गुजराती भारतीय कुटुंब पूर्व आफ्रिकेतून कॅनडामार्गे अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. कश्यप 'काश' पटेल यांचे वडील एका विमान कंपनीत वित्तीय अधिकारी म्हणून काम करत होते.
कश्यप 'काश' पटेल यांनी रिचमंड विद्यापीठात पदवीपूर्व शिक्षण घेतले. त्यानंतर ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून आंतरराष्ट्रीय कायद्यातील प्रमाणपत्रासह कायद्याची पदवी मिळवली. यानंतर कश्यप 'काश' पटेल यांना प्रतिष्ठित लॉ फर्ममध्ये नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी वकील म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनी मियामीमधील स्थानिक आणि फेडरल कोर्टात जवळपास नऊ वर्षे काम केले.
दरम्यान, कश्यप 'काश' पटेल यांनी आपल्या मागील कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर डोनाल्ड ट्रम्प यांचे दहशतवादविरोधी सल्लागार आणि कार्यवाहक संरक्षण सचिवांचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. तसेच राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी म्हणून बऱ्यापैकी अनुभव मिळवला. त्यांनी अल-कायदा आणि ISIS सारख्या गटांशी संबंधित व्यक्तींचा तपास आणि खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.