तीन दिवसांत 'तिचे' ३१ हजार कोटी रुपये बुडाले! कसे काय? कोण आहे 'ही' महिला, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 08:04 IST2025-03-28T08:03:41+5:302025-03-28T08:04:12+5:30
एका रात्रीत वर्तमान आणि भविष्य कसं बदलतं याचं हे एक ठळक उदाहरण!

तीन दिवसांत 'तिचे' ३१ हजार कोटी रुपये बुडाले! कसे काय? कोण आहे 'ही' महिला, जाणून घ्या
‘शेअर बाजारात पैसा गुंतवला की तो दामदुपटीनं वाढतो, त्यामुळे त्यातच आपला जास्तीत जास्त पैसा गुंतवावा’ आणि ‘शेअर बाजारात पैसे गुंतवले तर लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागणार नाही’ अशी दोन्ही प्रकारची मतं शेअर बाजाराबाबत ऐकायला मिळतात. अर्थातच दोन्ही गोष्टी पूर्णपणे सत्य नाहीत. पण शेअर बाजारात हुशारीनं पैसा गुंतवला, फार लोभ दाखवला नाही, तर इतर गुंतवणुकीपेक्षा शेअर बाजार तुम्हाला नक्कीच जास्त पैसा देऊन जातो, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यातलं तारतम्य तुम्ही पाळायला हवं, हा त्याचा मतितार्थ.
पण शेअर बाजार तुम्हाला एका रात्रीत कसा गर्भश्रीमंत करतो आणि एका रात्रीत तुम्हाला दणकन जमिनीवर कसा आदळतो, याचं एक उदाहारण नुकतंच इंडोनेशियात घडलं आहे. सर्वाधिक मुस्लीम बांधव असलेला इंडोनेशिया हा जगातला प्रमुख देश. याच देशातील मरीना बुडीमान (Marina Budiman) ही ‘सर्वाधिक श्रीमंत’ महिला. मरीना यांची ‘डीसीआय इंडोनेशिया’ ही एक प्रख्यात कंपनी. या कंपनीचं इंडोनेशियात बरंच नाव आहे. मरीना यांना जो नावलौकिक मिळाला, तोही या कंपनीमुळेच. इंडोनेशियाच्या तंत्रज्ञान क्षेत्रात मरीना यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं.
त्यांच्या बाबतीत एक मोठा ‘चमत्कार’ जगानं अनुभवला. गेल्या आठवड्यात तीन दिवसांत त्यांना आपली तब्बल ३.६ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३१ हजार कोटी रुपयांची संपत्ती गमवावी लागली! तीनच दिवसांत त्यांची संपत्ती चक्क निम्म्यानं कमी झाली! कारण काय? - तर शेअर बाजारातील चढउतार!
पण त्याहून आश्चर्याची गाेष्ट म्हणजे तीन दिवसांत ही जी अब्जावधी रुपयांची संपत्ती त्यांना गमवावी लागली, त्याआधी काही दिवस त्या सातत्यानं दिवसाला तीन हजार कोटी रुपये कमवत होत्या! अर्थात ही किमयाही शेअर बाजाराचीच! ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार शेअर बाजारात अचानक तेजी आली आणि मरीना यांची संपत्ती काहीच दिवसांत इतकी वाढली की ती ७.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. पण, त्याचंच दुसरं टोक म्हणजे हीच संपत्ती ज्या झपाट्यानं आणि डोळे दीपवणाऱ्या वेगानं वाढली, ती पत्त्यांच्या बंगल्यांपेक्षाही वेगानं जमीनदोस्त झाली! अर्थात तज्ज्ञांचं म्हणणं आहे, शेअर बाजारात अशा गोष्टी होतच असतात. मरीना यांच्या कपंनीचे शेअर घसरले म्हणून लगेच त्या कंपनीचं अस्तित्व संपलं किंवा या कंपनीचं भविष्य खराब झालं असं नाही. स्वत: मरीना यांनाही या गोष्टीचा फारसा गमपस्तावा नाही. त्या म्हणतात, शेअर बाजारातील तेजीमुळे माझी संपत्ती वाढल्यानं मला हर्षवायू झाला नव्हता आणि आता शेअर बाजारातील घसरणीमुळे माझी अर्धी संपत्ती कमी झाल्यानं मी दु:खात बुडाले असं नाही. या गोष्टींची तयारी आणि मानसिकता तुम्ही ठेवलीच पाहिजे.
शेअर बाजारातील चढउतार ही इंडोनेशियासाठी नेहमीची बाब आहे. त्यामुळेच ‘डीसीआय इंडोनेशिया’ कंपनीच्या शेअर्समधील तीव्र फेरबदलही याला अपवाद नाहीत. इंडोनेशियातील अनेक कंपन्या तर अशा आहेत, ज्यांच्या शेअर्समध्ये तब्बल १००० टक्क्यांहून अधिक वाढ आणि घट पाहायला मिळालेली आहे. अर्थातच एवढे चढउतार नकोत, पण त्यामुळे एका रात्रीत वर्तमान आणि भविष्य कसं बदलतं याचं हे एक ठळक उदाहरण!