Sachit Mehra: कोण आहेत सचित मेहरा, ज्यांच्यावर सोपवली गेलीये पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:55 IST2025-01-07T17:52:11+5:302025-01-07T17:55:42+5:30
Sachit Mehra Liberal Party: जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा अचानक राजीनामा दिला. सध्या ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार असून, पुढील पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी आता भारतीय वंशाचे सचित मेहरा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Sachit Mehra: कोण आहेत सचित मेहरा, ज्यांच्यावर सोपवली गेलीये पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी?
कॅनडात अचानक राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सत्ताधारी लिबरल पार्टीचे नेतेपदही त्यांनी सोडले आहे. पण, नवीन सभागृह नेत्याची निवड होईपर्यंत जस्टिन ट्रुडो काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करत राहणार आहेत. लिबरल पार्टीचा नेता म्हणजे कॅनडाचा पुढचा पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी आता भारतीय वंशाचे सचित मेहरा यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
ऑक्टोबर २०२५ पर्यंतचा कार्यकाल बाकी असताना जस्टिन ट्रुडो यांनी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय अस्थितरता निर्माण झाली आहे. कॅनडात लवकरच निवडणूक होणार, असाही राजकीय अर्थ ट्रुडो यांच्या राजीनाम्याचा काढला जात आहे. पण, कॅनडाचा पुढचा पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे, ते सचित मेहरा कोण आहेत, हे जाणून घ्या...
कोण आहेत सचित मेहरा?
सचित मेहरा हे भारतीय वंशाचे कॅनडास्थित उद्योजक आहेत. ते सध्या लिबरल पार्टीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील दिल्लीत राहायचे. १९६० च्या दशकात ते कॅनडाला गेले. कॅनडामध्ये विन्निपेग आणि ओटावा शहरातील ईस्ट इंडिया कंपनीच्या रेस्तरॉ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेस्तरॉ सुरू केले. सचित मेहरा सध्या हाच उद्योग सांभाळतात.
सचित मेहरा हे सध्या ईस्ट इंडिया कंपनी रेस्तरॉचे मालक आहेत. त्याचबरोबर इतरही उद्योग ते करतात. सचित मेहरा हे कॅनडातील मॅनिटोबा येथे राहतात. ते कम्युनिटी रिलेशनचे उपाध्यक्ष आहेत. १९९४ पासून ते कौटुंबीक व्यवसाय सांभाळतात.
सचित मेहरा २०१३ ते २०१६ या काळात विन्निपेग डाऊनटाऊन बीजचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कॅनडात काम केले.
सचित मेहरांनी लिबरल पार्टी कधी केला प्रवेश?
उद्योजक असलेल्या सचित मेहरा यांना राजकारणातही रस आहे. त्यांनी २०१९ मध्ये राजकारणात पाऊल ठेवले, ते लिबरल पार्टीत प्रवेश करून! २०२३ मध्ये त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर नव्या नेत्याची निवड करण्याची जबाबदारी आली आहे.
लिबरल पार्टीमध्ये जस्टिन ट्रुडो यांच्यानंतर सचित मेहरा हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. ते लिबरल पार्टीच्या राष्ट्रीय मंडळ संचालकांमध्येही आहेत. पक्षाचे अध्यक्ष या नात्याने त्यांच्यावर पक्ष सदस्य वाढवणे, निधी गोळा करणे, पार्टीसाठी प्रचाराची दिशा निश्चित करणे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या संदर्भाने जबाबदारी देणे आदी कामे करण्याची जबाबदारी आहे.
कोणत्या नेत्यांची नावे चर्चेत?
जस्टिन ट्रुडो यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यात माजी उप पंतप्रधान क्रिस्टिया फ्रिलँड, केंद्रीय बँकेचे माजी अधिकारी मार्क कार्नी, वाहतूक मंत्री अनिता आनंद यांचा समावेश आहे. यापैकी काही नेत्यांची नावे निश्तित केली जातील आणि त्यातील एका नावाची निवड केली जाईल.