कोण आहे शंदाना गुलजार? पेशावर हल्ल्यानंतर का लावला देशद्रोहाचा आरोप? वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 11:56 AM2023-02-03T11:56:45+5:302023-02-03T12:03:45+5:30

Shandana Gulzar : शंदाना गुलजार यांनी केंब्रिज विद्यापीठातून एलएलएमची पदवी घेतली आहे.

Who is Shandana Gulzar, Pakistani leader charged with sedition for remarks against PM Shehbaz Sharif | कोण आहे शंदाना गुलजार? पेशावर हल्ल्यानंतर का लावला देशद्रोहाचा आरोप? वाचा सविस्तर...

कोण आहे शंदाना गुलजार? पेशावर हल्ल्यानंतर का लावला देशद्रोहाचा आरोप? वाचा सविस्तर...

googlenewsNext

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या नेत्या शंदाना गुलजार खान यांच्याविरुद्ध घटनात्मक संस्थांविरोधात भडकावल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पाकिस्तान मीडिया संघटनेने माहिती दिली आहे.दरम्यान, खैबर पख्तुनख्वामधील बॉम्बस्फोटाबाबत शंदाना गुलजार यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर मोठा आरोप केला होता. 

पाकिस्तान पंतप्रधानांच्या विनंतीवरून तेहरीक-ए-तालिबानच्या मशिदीमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला होता, ज्यात 40 हून अधिक लोक मारले गेले होते, असे त्यांनी म्हटले होते.  शंदाना यांच्याविरुद्ध कलम १५३अ (गटांमधील वैर वाढवणे), ५०५ (सार्वजनिक क्षोभ निर्माण करणारे विधान) आणि १२४ए (देशद्रोह) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानातील विरोधी पक्ष पीटीआयच्या नेत्यांवर देशद्रोहाचा आरोप करणे ही काही नवीन गोष्ट नाही. 

पाकिस्तानातील अशा नेत्यांची यादी लांबलचक आहे, ज्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, त्यात शंदाना यांचे नाव जोडले गेले आहे. जानेवारीमध्ये, ज्येष्ठ नेते फवाद चौधरी यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, असे द एक्सप्रेस ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे. त्याआधी माजी केंद्रीय मंत्री अली अमीन गंडापूर आणि पीटीआयचे शाहबाज गिल यांच्यावरही असेच आरोप झाले आहेत. मात्र, शंदाना यांना अटक होण्यापूर्वीच ट्रान्झिट रिमांड मिळाला आहे.

कोण आहेत शंदाना गुलजार?
शंदाना गुलजार खैबर पख्तुनख्वामधील राखीव महिला जागेवरून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2018 मध्ये त्यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये शपथ घेतली होती. याआधी त्यांनी पाकिस्तान सरकारमध्ये संसदीय सचिव म्हणूनही काम केले आहे. तसेच, त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून एलएलएमची पदवी घेतली आहे.

एप्रिल २०२२ मध्ये राजीनामा दिला
एप्रिल २०२२ मध्ये शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड होण्यापूर्वी शंदाना गुलजार यांनी आपल्या पक्षाच्या इतर सदस्यांसह राजीनामा दिला होता. नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी हे सामूहिक राजीनामे स्वीकारण्यास नकार दिला आणि सांगितले होते की त्यांची वैयक्तिकरित्या पडताळणी केली जाईल. नंतर 130 पैकी केवळ 11 खासदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले, त्यात शंदाना गुलजार यांचा समावेश होता.

जानेवारीमध्ये पाकच्या खासदारांनी पुन्हा राजीनामे दिले होते
पाकिस्तानी मीडियाच्या रिपोर्टनुसार, या वर्षी जानेवारीमध्ये पुन्हा एकदा पीटीआयच्या 51 खासदारांनी एकत्र राजीनामा दिला होता, जे प्रतिक्षेत होते. 24 जानेवारीला यापैकी 45 खासदारांनी राजीनामे मागे घेतले होते. पीटीआयचे नेते फवाद चौधरी म्हणाले होते की, विरोधी पक्षनेते म्हणून संसदेत परतण्याची वेळ आली आहे.

Web Title: Who is Shandana Gulzar, Pakistani leader charged with sedition for remarks against PM Shehbaz Sharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.