Paetongtarn Shinawatra : कोण आहेत पायतोंगटार्न शिनावात्रा? ज्यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी झालीय नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 02:41 PM2024-08-16T14:41:48+5:302024-08-16T14:43:01+5:30

Paetongtarn Shinawatra : पायतोंगटार्न शिनावात्रा या आपली काकी यिंगलक यांच्यानंतर हे पद भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत.

Who is Thailand’s youngest Prime Minister Paetongtarn Shinawatra? | Paetongtarn Shinawatra : कोण आहेत पायतोंगटार्न शिनावात्रा? ज्यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी झालीय नियुक्ती

Paetongtarn Shinawatra : कोण आहेत पायतोंगटार्न शिनावात्रा? ज्यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी झालीय नियुक्ती

Thailand News Prime Minister :थायलंडच्या पंतप्रधानपदी पायतोंगटार्न शिनावात्रा (Paetongtarn Shinawatra) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पायतोंगटार्न शिनावात्रा या मोठे उद्योगपती आणि माजी पंतप्रधान थाकसिन यांच्या कन्या आहेत. त्या देशातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरणार आहेत. तसंच, पायतोंगटार्न शिनावात्रा या आपली काकी यिंगलक यांच्यानंतर हे पद भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत.

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, माजी पंतप्रधान श्रेथा थाविसिन (PM Srettha Thavisin) यांना घटनात्मक न्यायालयानं बडतर्फ केल्यानंतर दोन दिवसांनी पायतोंगटार्न शिनावात्रा यांची निवड झाली आहे. दोघेही फेउ थाई पक्षाचे आहेत. हा पक्ष २०२३ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आला होता, परंतु त्यांनी सत्ताधारी आघाडी स्थापन केली होती.

दरम्यान, पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. थायलंडची रखडलेली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणं, तसंच लष्करी उठाव आणि न्यायालयाचा हस्तक्षेप टाळण्याची जबाबदारी पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्यावर आहे. या आव्हानामुळं त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील चार सरकारं कोसळली होती.

कुटुंबातील चौथा सदस्य होणार पंतप्रधान 
शुक्रवारी पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्या समर्थनार्थ ३१९ आणि विरोधात १४५ मतं मिळाली. गेल्या दोन दशकांत पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेल्या पायतोंगटार्न शिनावात्रा या त्यांच्या कुटुंबातील चौथ्या सदस्या आहेत. त्यांचे वडील थाकसिन आणि काकी यिंगलक यांच्यासह तीन सदस्यांना लष्करी उठाव किंवा घटनात्मक न्यायालयाच्या निर्णयांद्वारे पदावरून हटवण्यात आले होते.

श्रेथा थाविसिन यांची हकालपट्टी दुर्दैवी - पायतोंगटार्न 
थायलंडच्या घटनात्मक न्यायालयानं बुधवारी पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना पदावरून हटविलं. एका नैतिकतेच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी शिक्षा झालेल्या नेत्याला श्रेथा थाविसिन यांनी मंत्रिपदावर नियुक्त केलं होतं. यावरून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून पायतोंगटार्न शिनावात्रा यांचं नाव पुढं आल्यानंतर गुरुवारी त्यांनी श्रेथा थाविसिन यांच्या कार्याचे कौतुक केलं. तसंच, श्रेथा थाविसिन यांची हकालपट्टी दुर्दैवी असल्याचं सांगितलं.

पायतोंगटार्न यांनी कुटुंबाच्या हॉटेल ग्रुपमध्ये काम केलंय
पायतोंगटार्न शिनावात्रा यांचे शिक्षण थायलंडमधील उच्चभ्रू शाळा आणि ब्रिटनमधील विद्यापीठात झाले आहे. शिक्षणानंतर शिनावात्रा कुटुंबाच्या रेंडे हॉटेल ग्रुपमध्ये त्यांनी काही वर्षे काम केलं, याठिकाणी त्यांचे पती उपमुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून काम करतात. पायतोंगटार्न शिनावात्रा या २०२१ मध्ये फेउ थाईमध्ये सामील झाल्या आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांची पक्षाच्या नेत्या म्हणून नियुक्ती झाली. पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्या नियुक्तीमुळे थायलंडच्या सर्वोच्च नेतृत्वात नवी ऊर्जा आली आहे. फेउ थाई सदस्यांना आशा आहे की, त्या पक्षाचे राजकीय भवितव्य पुनरुज्जीवित करण्यास मदत करतील.

Web Title: Who is Thailand’s youngest Prime Minister Paetongtarn Shinawatra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.