ओसामा लादेनचा खात्मा केला कोणी?

By Admin | Published: November 8, 2014 02:08 AM2014-11-08T02:08:29+5:302014-11-08T02:08:29+5:30

कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या मे २०११ मधील खात्म्याचे श्रेय रॉबर्ट ओ नील या माजी सील कमांडोने घेतल्यानंतर आता बाकीचे सील कमांडोही या मैदानात उतरले

Who killed Osama bin Laden? | ओसामा लादेनचा खात्मा केला कोणी?

ओसामा लादेनचा खात्मा केला कोणी?

googlenewsNext

वॉशिंग्टन : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या मे २०११ मधील खात्म्याचे श्रेय रॉबर्ट ओ नील या माजी सील कमांडोने घेतल्यानंतर आता बाकीचे सील कमांडोही या मैदानात उतरले असून, ओसामाची हत्या करणारे, त्याला तीन गोळ्या घालणारे वेगळेच दोघे होते असा दावा आता केला जात आहे. ओ नील ओसामाच्या खोलीत येण्याआधीच त्याला मारण्यात आले होते असा या उर्वरित सील कमांडोंचा दावा आहे.
२ मे २०११ रोजी अमेरिकेचे सहा सील कमांडोंचे पथक अगदी गुप्तरीत्या पाकिस्तानात शिरले. अबोटाबाद येथे ओसामा बिन लादेनच्या घरात शिरून त्यांनी ओसामाचा खात्मा केला. या घटनेचे भलेबुरे परिणाम झाले. आता ओसामाला अखेरच्या तीन गोळ्या कोणी घातल्या, हा हीरो कोण असा प्रश्न उभा राहिला आहे. २०१३ साली ओ नील याने इस्क्वायर मासिकाला मुलाखत देऊन आपणच ओसामाला अखेरच्या तीन गोळ्या घातल्या असे सांगितले होते. ओ नील याने पुन्हा ही स्टोरी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली असून ही मुलाखत शनिवारी प्रसारित होणार आहे. गोपनीय कायद्याचा भंग केला म्हणून त्याच्यावर कारवाईही होण्याची शक्यता आहे.
असा सर्व घटनाक्रम प्रसिद्ध झाल्यानंतर आता आणखी एक दावा पुढे येत असून सहा सील कमांडोंच्या पथकातील अन्य एका कमांडोने आपणच लादेनचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. एका सूत्राचा हवाला देऊन वॉशिंग्टन पोस्टने हे वृत्त प्रकाशित केले असून त्यानुसार कमांडो पथकातील अन्य दोघे ओ नीलच्या आधी ओसामाच्या खोलीत गेले व त्यांनी आधी ओसामाला गोळ्या घातल्या. या दोघांची नावे देण्यात आलेली नाहीत. तसेच माजी सील कमांडो मॅट बिसोनेट याने २०१२ साली ‘नो इझी डे’ हे पुस्तक लिहून हा घटनाक्रम वर्णिला आहे. वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ओ नीलनेही बिसोनेट या मोहिमेत सहभागी असल्याचे सांगितले आहे. आपल्याबरोबर दोन कमांडो होते, त्यात एक बिसोनेट होता, असे ओ नीलचे म्हणणे आहे; पण इस्क्वायर मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने बिसोनेटचे नाव घेतलेले नाही.
एवढेच नाही तर ओ नीलने ९-११ च्या हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना ही स्टोरी सांगितली असून, आपणच क्रूरकर्मा ओसामाला ठार मारले असे म्हटले आहे. या हल्ल्याच्या वेळी ओ नीलने वापरलेला शर्टही अमेरिकेतील नव्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या स्मारकात ठेवण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Who killed Osama bin Laden?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.