शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 10:52 AM2024-09-27T10:52:22+5:302024-09-27T10:52:39+5:30
संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी युनूस न्यूयॉर्कला आले होते. यावेळी तेथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
बांगलादेशमध्ये आता कट्टरपंथीयांनी ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. हिंदूंवर अत्याचार होत असताना लष्करात महिलांना हिजाब घालण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या विरोधात जे आंदोलन झालेले ते असेच झालेले नाही तर कट रचून करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. हसिना यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी कट रचण्यात आला होता, याचा मास्टरमाईंड कोण होता याची माहिती सध्याचे काळजीवाहू मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी दिली आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी युनूस न्यूयॉर्कला आले होते. यावेळी तेथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या परिषदेत त्यांनी शेख हसीना सरकार उलथून टाकण्याचा संपूर्ण कट रचलेल्या व्यक्तीचे नाव जगासमोर आणले.
न्यूयॉर्कमधील क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्हमध्ये लोकांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आपला विशेष सहाय्यक महफुज आलम याची उपस्थितांना ओळख करून दिली. महफूज आलम सामान्य तरुणांसारखाच वाटतो. पण जेव्हा तुम्ही त्याचे काम पहाल तेव्हा थक्क व्हाल. हफूज आलममुळेच बांगलादेशात तरुणांची चळवळ उभी राहिली. त्याच्या भाषणातून त्याने तरुणांमध्ये उर्जेचा नवा स्रोत निर्माण केला, असे मोहम्मद युनूस म्हणाले. तेच नवीन बांगलादेश घडवत आहेत, आपण त्यांना यश मिळवून देऊया, असेही आवाहन युनूस यांनी केले.
युनूस-मोदी बैठक नाही...
संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यात कोणतीही बैठक होणार नाही. बांगलादेशने सांगितले की, मुख्य सल्लागार प्रोफेसर युनूस हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक करणार नाहीत. पंतप्रधान मोदी UNGA साठी पोहोचण्यापूर्वीच युनूस हे त्यांच्या ५७ सदस्यीय शिष्टमंडळासह न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत युनूस द्विपक्षीय बैठक करणार आहेत.