इम्रान खान यांनी कसा रोखला कोरोना?; WHOनं सांगितली पाकिस्तानची रणनीती
By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 30, 2020 04:52 PM2020-09-30T16:52:39+5:302020-09-30T16:56:08+5:30
पाकिस्तानात आतापर्यंत जवळपास 3 लाख कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 6474 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्लामाबाद - जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरस नियंत्रनासंदर्भात पाकिस्तानचे पुन्हा कौतुक केले आहे. पाकिस्तानने केवळ कोरोनाचा प्रसारच थांबवला नाही, तर महामारीदरम्यान आपल्या अर्थव्यवस्थेकडेही लक्ष दिले, असे WHOचे प्रमूख टेड्रोस अॅडहॅनम यांनी म्हटले आहे. त्यांनी ब्रिटिश वृत्तपत्र, 'द इंडिपेंडंट'सोबत बोलताना ही माहिती दिली.
टेड्रोस म्हणाले, पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांत पोलिओसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले होते. त्याचा वापर त्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी केला. ज्या सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांना घरा-घरात जाऊन पोलिओचा डोस देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते, त्याच आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत पाकिस्तानने कोरोना काँटॅक्ट ट्रेसिंग आणि सर्व्हिलांसिंगसाठी घेतली. तसेच, पाकिस्तानला या रणनीतीमुळे कोरोना व्हायरसवर नियंत्रण तर मिळवता आलेच पण त्यांच्या अर्थव्यवस्थेचा गाडाही पटरीवर आला, असेही ट्रेडोस म्हणाले.
कोरोना नियंत्रणात आल्याने पाकिस्तानात स्थिरता आली आहे. यामुळे आता त्यांच्या अर्थव्यवस्थेनेही वेग घेतला आहे. कोरोनाला रोखणे आणि अर्थव्यवस्था सांभाळणे दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायला हव्यात. यांपैकी केवळ एका गोष्टीची निवड करता येत नाही.
कोरोनाला रोखण्यात पाकिस्तानबरोबरच थायलंड, इटली, उरुग्वे आणि इतर देशांच्या सामूहिक प्रयत्नांचीही ट्रेडोस यांनी प्रशंसा केली. मे महिन्यातही जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी पाकिस्तानची प्रशंसा केली होती. यावेळी जगानेही कोरोनाचा सामना कसा करावा हे पाकिस्तानकडून शिकायला हवे, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानात 36 टक्के वर्कफोर्समध्ये कोरोनाविरोधातील इम्युनिटी विकसित -
पाकिस्तानातच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे, की आता पाकिस्तानात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ब्लड डिसीज, कराचीच्या या स्टडीला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमध्येही प्रकाशित करण्यात आले आहे. पाकिस्तानात 36 टक्के वर्कफोर्समध्ये कोरोनाविरोधातील इम्युनिटी विकसित झाली असल्याचेही या स्टडित सांगण्यात आले आहे. पाकिस्तानात आतापर्यंत जवळपास 3 लाख कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 6474 लोकांचा मृत्यू झाला आहे.