सिगारेटसाठी हत्या… अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये भारतीय तरुणावर गोळीबार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:30 AM2024-06-24T10:30:59+5:302024-06-24T10:31:59+5:30
या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अमेरिकेत सिगारेटचे पाकीट एका भारतीय तरुणाच्या मृत्यूचे कारण ठरले. दासरी गोपीकृष्ण असे मृत तरुणाचे नाव असून ते अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये काम करत होते. फक्त सिगारेटच्या पॅकेटसाठी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. ही घटना २१ जून रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय गोपीकृष्ण हे शनिवारी दुपारी दुकानाच्या काउंटरवर होते. यादरम्यान, अज्ञात हल्लेखोराने दुकानात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात काउंटरवर उपस्थित असलेले गोपीकृष्ण गंभीर जखमी झाले. यावेळी हल्लेखोराने आपल्याला हवे असलेले सिगारेटचे पाकीट घेऊन तेथून पळ काढला. या घटनेनंतर गोपीकृष्ण यांना उपस्थित लोकांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यामध्ये हल्लेखोर गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहे.
गोपीकृष्ण हे आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील कर्लापलेम मंडलातील याजली येथील रहिवासी होते. नोकरीनिमित्त ते पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलासह अमेरिकेला गेले होते. अमेरिकेत ते एका नातेवाईकाच्या घरी राहत होते. तसेच, गोपीकृष्ण हे अमेरिकेतील अर्कान्ससमधील एका सुपरमार्केटमध्ये काम करत होते. या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
दरम्यान, ह्युस्टनमधील भारतीय दूतावासानेही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात गोपीकृष्ण यांच्या निधनाची घटना अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे. तसेच, दूतावासानेही मृतांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. स्थानिक कुटुंबीयांच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून पीडित कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी गोपीकृष्णाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी लिहिले आहे की, गोपीकृष्ण यांचे पार्थिव घरी आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. सरकार त्यांच्या कुटुंबासोबत आहे. यासोबतच चंद्राबाबू नायडू यांनी कुटुंबाप्रती संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.