आता गाझावर कुणाचे राज्य असणार? इस्रायल-अमेरिकेनं बनवला हमासच्या खात्म्यानंतरचा प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 12:26 PM2023-11-01T12:26:02+5:302023-11-01T12:26:25+5:30
अमेरिका आणि इस्रायल हमासच्या खात्म्यानंतर, गाझाच्या भविष्याचा प्लॅन तयार करत आहेत.
हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत जबरदस्त बॉम्बिंग केल्यानंतर आता जमिनीवरील कारवाईलाही सुरुवात केली आहे. या हल्ल्यात हमासचे100 हून अधिक कमांडर मारले गेले आहेत. यात 7 ऑक्टोबरचा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या इब्राहिम बियारीसह अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे. इस्रायलने हमास समूळ नष्ट करेपर्यंत युद्ध सुरूच राहील अशी घोषणाही केली आहे.
यातच, अमेरिका आणि इस्रायल हमासच्या खात्म्यानंतर, गाझाच्या भविष्याचा प्लॅन तयार करत आहेत. यात, हमासच्या खात्मानंतर, जवळपासच्याच काही देशांना अथवा यूएनच्या एजन्सींनाच काही काळासाठी प्रशासन सोपविल्या जाण्याच्या पर्यायासोबतच इतरही काही पर्यायांवर विचार केला जात आहे.
यात, पॅलेस्टाईनचे एक सरकार स्थापन करून तेथील व्यवस्था व्यवस्थित झाल्यानंतर स्थानिक सरकारकडे त्याची जबाबदारी देण्यासंदर्भातही विचार होऊ शकतो. मात्र, इस्रायल यापासून दूर राहणेच पसंत करू शकतो. अशा स्थितीत कोणत्या देशांना गाझा पट्टीचे प्रशासन चलविण्याची जबाबदारी द्यावी हे मोठे आव्हान आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे संरक्षणमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी या संदर्भात मंगळवारी एक बैठक बोलावली होती. यात अनेक पर्यायांसंदर्भात चर्चा झाली. यात, अनेक देश मिळून हे काम करतील, असाही पर्याय असल्याचे ब्लिंकन यांचे म्हणणे आहे. मात्र, पॅलेस्टिनी प्राधिकरणालाच शासन देणे योग्य ठरेल, पण हे कसे शक्य होईल? यावरही विचार करावा लागेल, असेही अँटोनी ब्लिंकन यांनी म्हणाले आहे.