अमेरिका नक्की कोणासोबत? सौदी अरेबियाला चुचकारून कतारला विकणार F-15
By admin | Published: June 15, 2017 01:21 PM2017-06-15T13:21:37+5:302017-06-15T13:21:37+5:30
कतारने अमेरिकेकडून F-15 लढाऊ विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आखाती देशांमधील तणावात अधिक भर पडणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 15 - कतारने अमेरिकेकडून F-15 लढाऊ विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आखाती देशांमधील तणावात अधिक भर पडणार आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जीम मॅटीस आणि कतारचे संरक्षण मंत्री खालीद अल अतियाह यांनी लढाऊ विमान खरेदी करारावर स्वाक्ष-या केल्या. हा एकूण 12 अब्ज डॉलरचा व्यवहार आहे. शेजारी देशांनी कतारवर दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप करुन सर्व संबंध तोडून टाकले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला पाठिंबा दिला असला तरी, अन्य अमेरिकी अधिका-यांचे चर्चेतून मार्ग काढावा असे मत आहे. या लढाऊ विमानांमुळे कतारची क्षमता वाढणार असून, अमेरिका-कतारचे संबंधही बळकट होणार आहेत. मॅटीस आणि अल अतियाह यांच्यामध्ये संरक्षण तसेच इसिसच्या मुद्यावरही चर्चा झाली. पेंटागॉनने या संरक्षण व्यवहाराबद्दल अधिका माहिती दिली नसली तरी ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार कतार अमेरिकेकडून 36 लढाऊ विमाने विकत घेणार आहे.
दहशतवाद पसरवणे व प्रादेशिक शांतता भंग करणे या कारणांवरून सौदी अरेबिया, युएई, बहारिन व इजिप्तने कतारशी राजनैतिक संबंध तोडले आहेत. या सर्व देशांनी कतारवर दहशतवादाला समर्थन दिल्याचा आरोप लावला आहे. बहारिनने सोमवारी कतारसोबत आपले संबंध तोडत असल्याच्या निर्णयाची माहिती दिली. दहशतवादाला समर्थन देण्याव्यतिरिक्त आपल्या अंतर्गत गोष्टींमध्ये कतार ढवळाढवळ करत असल्याचंही बहारिनने सांगितलं आहे. बहारिन आणि सौदी अरेबियाचे अत्यंत चांगले संबंध आहेत.
चारही देशांनी कतासबोत फक्त राजकीय संबंधच नाही तर हवाई आणि समुद्री संपर्कही तोडण्याची घोषणा केली आहे. बहारिनने कतारमध्ये राहत असलेल्या आपल्या सर्व नागरिकांना परत येण्यासाठी 14 दिवसांची वेळ दिली आहे. सौदी अरबने आपल्या निर्णयाची माहिती देताना दहशतवाद आणि कट्टरपंथीयांपासून बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता हा निर्णय घेतला गेल्याचं सौदीमधील अधिकृत न्यू़ज एजन्सीच्या सुत्रांकडून कळलं आहे. सौदीने आपल्या सर्व मित्र देश आणि कंपन्यांना कतारसोबत संपर्क तोडण्याचं आवाहन केलं आहे.