कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 01:55 PM2024-07-06T13:55:13+5:302024-07-06T13:55:39+5:30
गेल्या वर्षी रात्रीच्यावेळी हमासने इस्त्रायलच्या आकाशात हजारो क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. यामुळे खवळलेल्या इस्रायलने गाझामध्ये असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेवर प्रतिहल्ला सुरु केला होता.
जगाला सध्या दोन युद्धांनी त्रस्त केले आहे. काही वर्षांपूर्वी सुरु झालेल्या रशिया- युक्रेन युद्धाने जगाला महागाईच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे. यानंतर लगेचच हमास-इस्रायल युद्ध सुरु झाल्याने तिसऱ्या महायुद्धाकडे जग चाललेय की काय अशी भीती वाटू लागली होती. परंतू, आता दिलासा देणारी बातमी येत आहे. हमास-इस्रायल युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता बळावली आहे.
गेल्या वर्षी रात्रीच्यावेळी हमासने इस्त्रायलच्या आकाशात हजारो क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. यामुळे खवळलेल्या इस्रायलने गाझामध्ये असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेवर प्रतिहल्ला सुरु केला होता. इस्त्रायलने जवळपास गाझा हमासच्या ताब्यातून काढून घेत शहरही उध्वस्त केले आहे. अशातच मेटाकुटीला आलेल्या हमासने इस्रायलच्या बंधकांना मारण्यास सुरुवात केली होती. यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे होती. अमेरिकेसह मुस्लिम देशांनी या दोघांमध्ये युद्धबंदी करण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्याला आता यश येऊ लागले आहे.
हमासने बंधकांना सोडण्यावर आणि इस्रायलने युद्धविरामावर सहमती दर्शविली आहे. हमासने याची शनिवारी घोषणा केली. सर्व इस्रायली सैनिक आणि ओलीस ठेवलेल्या नागरिकांना सोडण्यात येणार आहे, असे हमासने म्हटले आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार पहिल्या टप्प्यात तात्पुरता युद्धविराम, मदत वितरण आणि इस्रायली सैन्य मागे घेण्याबाबत सहमती झालेली आहे. यानंतरच्या टप्पा लागू करण्यासाठी अप्रत्यक्ष चर्चा सुरु ठेवल्या जाणार आहेत.
इस्त्रायलच्या टीमनेही आता करार होण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून गाझामध्ये युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्न तीव्र झाले आहेत. यासाठी वॉशिंग्टन, इस्रायल आणि कतर यांच्यात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी करार करण्यासाठी अमेरिकन प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे.
गाझामध्ये युद्धबंदीसाठी दोहा, कतरमध्ये सतत बैठका सुरू आहेत. मोसाद गुप्तहेर संस्थेचे प्रमुख डेव्हिड बारनिया यांनी मध्यस्थांसोबत बैठक केली. नेतन्याहू यांनी हमाससोबत युद्धविराम करार आणि ओलीसांची सुटका करण्यासाठी गाझा येथे शिष्टमंडळ पाठवण्यास मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात एक टीम दोहाला पाठविली जाणार आहे.