पाकिस्तानात चहा पिण्यापासून लोकांना का रोखलं जातंय?; सरकारचं जनतेला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:56 PM2022-06-15T12:56:56+5:302022-06-15T14:28:05+5:30
मागील सरकारने अर्थव्यवस्था डबघाईला आणली असा आरोप मंत्री इकबाल यांनी केला. माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांच्या पक्षाने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली.
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्ताननं आता त्यांच्या जनतेला चहाचा वापर कमी करण्याचं आवाहन केले आहे. लोकांनी जास्त चहा पिऊ नये असं पाकिस्तानचे मंत्री अहसान इकबाल यांनी म्हटलं आहे. चहासाठी लागणारं साहित्य पाकिस्तानात आयात करावं लागतं. त्यामुळे जर जनतेने हे पाऊल उचललं तर आयातीवरील खर्च कमी होण्यास मदत मिळेल असं तेथील सरकारला वाटतं.
पाकिस्तान सरकार कर्ज घेऊन चहासाठी लागणारं साहित्य आयात करते. त्यामुळे आयातीवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सरकारच्या मंत्र्यांनी जनतेला आवाहन केले आहे. मंत्र्यांनी व्यापारी आणि देशातील जनतेला आवाहन केले आहे की, देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी. देशात वीजेचे संकट असल्याने बाजारात रात्री ८.३० नंतर वीज बंद केली जाते. एका पाकिस्तानी वृत्तपत्राशी मंत्री अहसान इकबाल यांनी हे विधान केले.
मंत्री अहसान इकबाल म्हणाले की, देशातील जनतेने रोजच्या दिनक्रमातून १-२ कप चहा कमी पिण्याचं आवाहन करतो. कारण चहासाठी लागणारं साहित्य आयात करावं लागतं आणि त्यासाठीही कर्जाने पैसे घ्यावे लागतात. पाकिस्तानी सरकारने मागील महिन्यात आयात खर्च कमी करण्यासाठी ४१ वस्तूंवर २ महिन्यांसाठी बंदी आणली आहे. परंतु त्याने जास्त फायदा होताना दिसत नाही. या निर्णयामुळे आयातीवरील खर्चात ६० कोटी डॉलर घट झाली परंतु हे एकूण आयात खर्चाच्या केवळ ५ टक्के इतकेच आहे.
पाकिस्तानी सरकारने कार, मोबाईल, सौंदर्य प्रसाधन, सिगारेट, खाद्य उत्पादने, काही कपडे, साहित्य आयात करण्यावर बंदी घातली आहे. मागील सरकारने अर्थव्यवस्था डबघाईला आणली असा आरोप मंत्री इकबाल यांनी केला. माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांच्या पक्षाने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली. आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर फसलं. परंतु देश वाचवण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत. पुढील काही महिन्यात अर्थव्यवस्था रुळावर येईल असा विश्वास आहे. कृषी क्षेत्रावर विशेष भर दिला जात आहे. गहू, साखर, कापूस उत्पादनाला चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना पामतेल वाढवण्यास सांगितले आहे जेणेकरून देशात या उत्पादनाची निर्यात करून परदेशी चलन मिळू शकेल असं मंत्री अहसान इकबाल यांनी सांगितले.