जगभर : मंत्र्याच्याच अटकेचे आदेश! अफगाणी महिलांना कोणीच वाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 07:35 IST2025-02-07T07:34:21+5:302025-02-07T07:35:46+5:30

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. तालिबानचे उप परराष्ट्रमंत्री शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजई यांनी जाहीरपणे केलेल्या एका विधानामुळे केवळ अफगाणी महिलांचेच नव्हे, तर अख्ख्या जगभराचे कान टवकारले गेले.

why Arrest warrant issued against minister sher mohammad abbas stanikzai | जगभर : मंत्र्याच्याच अटकेचे आदेश! अफगाणी महिलांना कोणीच वाली नाही

जगभर : मंत्र्याच्याच अटकेचे आदेश! अफगाणी महिलांना कोणीच वाली नाही

अफगाणिस्तानात काय चाललं आहे आणि तिथल्या महिलांची अवस्था किती दयनीय झाली आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. दिवसेंदिवस तिथल्या महिला अक्षरश: मरणाच्या दारात ढकलल्या जात आहेत. तालिबाननं त्यांचं आयुष्यच जणू नरकासमान करून टाकलं आहे. रोज एक नवा फतवा येतो आणि महिलांचं आयुष्य पहिल्यापेक्षा अधिक जखडून टाकलं जातं. 

काही दिवसांपूर्वी मात्र अफगाणिस्तानात अचानक आशेचा नवा किरण उगवला. आपलं आयुष्य आता पार मुळासकट बदलून जाईल, असा भाबडा आशावाद त्यांनाही नाहीच, पण प्रकाशाची एक अंधुक किनार तरी त्यांना दिसायला लागली होती. 

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. तालिबानचे उप परराष्ट्रमंत्री शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजई यांनी जाहीरपणे केलेल्या एका विधानामुळे केवळ अफगाणी महिलांचेच नव्हे, तर अख्ख्या जगभराचे कान टवकारले गेले. तालिबान इतकं ‘आधुनिक’ कसं काय झालं, अफगाणिस्तानातील महिलांचे दिवस आता पालटतील, त्यांना थोडं तरी स्वातंत्र्य बहाल केलं जाईल असं सगळ्यांनाच वाटायला लागलं.

शेर मोहम्मद यांचं विधानही तसं आशादायक आणि तालिबानच्या आतापर्यंतच्या भूमिकेच्या संदर्भात अत्यंत क्रांतिकारक होतं. पाकिस्तानी सीमेच्या जवळ असलेल्या खोस्त प्रांतात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमाप्रसंगी शेर मोहम्मद म्हणाले, अफगाणिस्तानचा इतिहास सांगतो, अगदी पुरातन काळातही अफगाणिस्तान अतिशय पुढारलेला होता. 

महिलांच्या शिक्षणाचे सारे मार्ग त्यावेळी खुले होते. महिला मुक्तपणे फिरू शकत होत्या. शिक्षण घेऊ शकत होत्या. त्या काळातही अफगाणिस्तानात अनेक महिला होऊन गेल्या, ज्यांनी देशाच्या विकासात मोठा हातभार लावला, त्यांच्या योगदानाविषयी बोलायला गेलो, तर वेळ पुरणार नाही, इतकं महान कार्य त्यांनी केलेलं आहे. 

अफगाणिस्तानात महिलांच्या शिक्षणावर घातलेली बंदी चुकीची आहे, ही बंदी लवकरात लवकर उठवली गेली पाहिजे, असं सांगताना महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या तालिबानच्या निर्णयावर त्यांनी टीकाही केली. ते म्हणाले, देशातल्या दोन कोटी लोकांवर आम्ही अन्याय करतो आहोत.

सरकारमधलाच एक महत्त्वाचा मंत्री हे बोलतोय, म्हटल्यावर तालिबानला आता उपरती आली की काय, तालिबान आता महिलांना अधिक हक्क प्रदान करणार का, त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आणि शिक्षणस्वातंत्र्य देणार का, असं वाटून अनेक महिलांना अत्यानंद झाला. पण... त्यांचा हा आनंद क्षणभंगूर ठरला.

शेर मोहम्मद यांच्या विधानानंतर लगेचच तालिबानी नेता मुल्ला अखुंदजादा यांनी लगेचच त्यांच्या अटकेचे आदेश दिले. आपल्याला अटक होणं अटळ आहे, आपली आता ‘सुटका’ नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनीही लगेच अफगाणिस्तानातून पळ काढण्याचा निर्णय घेतला. तातडीनं आपलं चंबूगबाळं आवरून देश सोडून त्यांना जावं लागलं. त्यांनी आता संयुक्त अरब अमिरातीत आश्रय घेतला आहे.

महत्त्वाचं म्हणजे शेर मोहम्मद यांनी भारतात मिलिटरी ट्रेनिंग घेतलेलं आहे. भारतातलं महिलांचं स्वातंत्र्य त्यांनी अनुभवलेलं आहे. स्वातंत्र्याच्या या अनुभवाचा त्यांच्या व्यक्तित्वावरही परिणाम झाला असावा. पण, तूर्तास तरी अफगाणी महिलांना कोणीच वाली नाही, हेच खरं!

Web Title: why Arrest warrant issued against minister sher mohammad abbas stanikzai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.