...म्हणून चिनी तरुण करतात पाकिस्तानी मुलींशी लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 05:18 PM2019-05-07T17:18:40+5:302019-05-07T17:20:11+5:30
चिनी तरुण हे पाकिस्तानी तरुणींशी विवाह करण्यास सर्वाधिक पसंती दर्शवत आहेत.
बीजिंग- चीनमध्ये कोणतंही दाम्पत्य एका अपत्याला जन्म देऊ शकते, असा नियम आहे. या नियमामुळे तिथल्या मुलींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे चिनी तरुण आता परदेशी मुलींशी लग्न करू लागले आहेत. यात चिनी तरुण हे पाकिस्तानी तरुणींशी विवाह करण्यास सर्वाधिक पसंती दर्शवत आहेत. चीनमध्ये सध्याच्या घडीला लैंगिक असमानतेच्या समस्येनं विक्राळ स्वरूप धारण केलं आहे. याचं कारण चीनमध्ये लग्न करण्यासाठी फार कमी मुली आहेत. तसेच जर चिनी तरुणाकडे स्वतःचा फ्लॅट नसेल तर मुलीचे पालक मुलीचा हात त्या चिनी तरुणाच्या हातात देत नाहीत. चीनच्या मोठ्या शहरांमध्ये महागडे फ्लॅट आहेत. त्यामुळे ते विकत घेणं हे चीन तरुणांसाठी थोडं मुश्कीलच आहे. त्यामुळे चिनी तरुण आता परदेशात जाऊन विवाह करतात. त्यानंतर ते त्यांना चीनला घेऊन येतात. अशी लग्न तुटतातही.
- पाकिस्तानमधल्या गरीब ख्रिश्चन मुलींशी लग्न
पाकिस्तानमध्ये चिनी तरुण मोठ्या प्रमाणात येतात. कारण तिथे जाऊन ख्रिश्चन मुलीशी लग्न करणं त्यांच्यासाठी सोपं असतं. पाकिस्तानात अशा प्रकारचं लग्न लावून देणारे एजंटही आहेत.
- पादरीपासून एजंटपर्यंत पैसे घेऊन करतात मदत
चिनी तरुण पाकिस्तानमध्ये येऊन लवकरात लवकर लग्न करू इच्छितात. पाकिस्तानमध्ये लग्न लावून देणार एजंट गरीब ख्रिश्चन तरुणींशी चिनी तरुणांचं लग्न लावून देतात. त्यांना लग्नासाठी 50 ते 60 हजारपर्यंत रक्कम दिली जाते. त्यानंतर अशा पादरीचा शोध घेतला जातो. जे चर्चमध्ये लग्न लावून देतील. त्याच्या मोबदल्यात पादरीलाही 50 हजारांपासून 1 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतात. सर्व खर्च मिळून अडीच लाखांमध्ये चिनी तरुण पाकिस्तानी तरुणींशी लग्न करतात. चीनमध्ये लग्न करणं महागडं आहे. तिथे मुलीच्या कुटुंबीयांनाही महागडी गिफ्ट द्यावी लागतात. तसेच ज्या मुलाकडे चांगली नोकरी आणि फ्लॅट आहे, त्या मुलाशीच चिनी पालक मुलींची लग्न लावून देतात. पाकिस्तानमध्ये लग्न केल्यानंतर चिनी तरुण पुन्हा मायभूमीत परततात. काहींच्या नातेसंबंधात सहा महिने ते वर्षभरात कटुता येते. तर काही जण पत्नीबरोबर कॉरिडोरशी संबंधित प्रकल्पासाठी पाकिस्तानमध्येच राहणं पसंत करतात. ते पाकिस्तानी पत्नीबरोबर तिकडेच राहतात. पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये एक पूर्ण चिनी शहर वसवलं जात आहे.
- व्हिएतनाम, लाओस आणि उत्तर कोरियातील मुलींशी करतात विवाह
पाकिस्तानमधल्या मुलींबरोबरच चिनी तरुण व्हिएतनाम, लाओस आणि उत्तर कोरियातील मुलींशी विवाह करण्यालाही पसंती देतात. चिनी तरुणांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नसते, तसेच नोकरीचंही काही खरं नसतं. गेल्या दोन वर्षांत 750 ते 1000 पाकिस्तानी तरुणींचं लग्न चिनी तरुणांबरोबर झालं आहे.