बांगलादेश का पेटला? विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकणे सरकारला पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 06:01 AM2024-08-06T06:01:37+5:302024-08-06T06:02:01+5:30

आंदोलकांना देशद्रोही म्हणणे, बंगालच्या कसाईंशी तुलना करण्याचे राजकारण हसीना यांना महागात पडले व परिणामी देश पेटला.

Why did Bangladesh burn? Crushing the students' agitation cost the government dearly | बांगलादेश का पेटला? विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकणे सरकारला पडले महागात

बांगलादेश का पेटला? विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकणे सरकारला पडले महागात

ढाका : सरकारी नोकऱ्यांसाठीची आरक्षण पद्धत रद्द करण्यासाठी सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पंतप्रधान शेख हसीना यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बळ मिळाले आणि इथेच ठिणगी पडली. आंदोलकांना देशद्रोही म्हणणे, बंगालच्या कसाईंशी तुलना करण्याचे राजकारण हसीना यांना महागात पडले व परिणामी देश पेटला.

नेमके काय घडले?

सरकारी नोकऱ्यांसंदर्भातील वादग्रस्त कोटा प्रणाली रद्द करावी यासाठी विद्यार्थ्यांनी जुलैमध्ये लाखोंच्या संख्येने आंदोलनाला शांततेत सुरुवात केली. मात्र १६ जुलै रोजी पोलिस आणि सरकार समर्थक कार्यकर्त्यांशी विद्यार्थ्यांची चकमक झाल्यानंतर याला हिंसक वळण लागले. अधिकाऱ्यांनी अश्रूधुराच्या नळकांड्या, रबराच्या गोळ्या झाडल्या. यात २०० पेक्षा अधिक जण ठार झाले. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून इंटरनेट बंद करण्यात आले. आंदोलकांवर दिसताक्षणी गोळी झाडण्याच्या आदेशासह कर्फ्यू लादण्यात आला. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण निर्णयात बदल केला होता. यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत होती, मात्र निषेध सुरूच होता. यावेळी सर्व स्तरातील लोक एकत्र आले आणि त्यांना मुख्य विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे आंदोलन आणखी पेटले. त्यामुळे शनिवारी आणि रविवारपर्यंत हिंसाचार आणखी पेटला. यात रविवारीपर्यंत किमान ३०० जण ठार झाले.

आंदोलन का?

बांगलादेशच्या १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या स्वातंत्र्य युद्धात लढलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी ३० टक्के सरकारी नोकऱ्या देण्याला विद्यार्थ्यांचा विरोध होता. याचा फक्त हसीना यांच्या पक्ष समर्थकांना फायदा होत असल्याचा आरोप बेरोजगार असलेल्या विद्यार्थ्यांनी केला होता. त्यामुळे आंदोलन पेटले. ३०० लोकांचा बळी घेणाऱ्या सरकारने राजीनामा देण्याची मागणी यातून पुढे आली. त्यात हसीना यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी हिंसाचार पेटला तर विरोधकांनी आंदोलनाची धार वाढविली.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चार मंदिरांची नासधूस

हसीना या विदेशात निघून गेल्यानंतर सोमवारी हिंसक जमावाने ढाका येथील भारताचे सांस्कृतिक दर्शन घडविणाऱ्या इंदिरा गांधी कल्चरल सेंटरमध्ये शिरून तिथे मोठी नासधूस केली. तसेच, निदर्शकांच्या कारवायांत त्या देशातील चार हिंदू मंदिरांचेही किरकोळ नुकसान झाले.

सरकार काय म्हणते?

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुला-नातूंना आरक्षण मिळणार नसेल तर रझाकारांच्या नातवंडांना आरक्षण मिळेल का, असे हसीना यांनी म्हटले. आंदोलनकर्ते विद्यार्थी नसून देशद्रोही आहेत आणि त्यांना लोखंडाने मारले पाहिले,  असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले अन् ते वाढत गेले.

पुढे काय होईल?

हिंसाचाराने विरोधकांची ताकद वाढली आहे. हसीना यांच्या हुकूमशाहीचा हा परिणाम असल्याचे ते म्हणत आहेत. येथे नोकऱ्यांचा अभाव आहे.  अशात हसीनांसाठी पुढील काळ संकटांनी भरलेला आहे. शेख हसीना पुन्हा राजकारणात सक्रिय होणार नाहीत, असे वक्तव्यही पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी केले आहे.

जगातील सर्वाधिक ट्रॅक केलेले विमान...

हसीना यांना घेऊन ढाक्याहून निघालेले वायुसेनेचे विमान साेमवारी जगातील सर्वाधिक ट्रॅक केलेले विमान ठरले. फ्लाईटरडार२४ या संकेतस्थळावर सुमारे २९ हजार नेटकऱ्यांची या विमानाच्या मार्गावर नजर हाेती. सर्वप्रथम काेलकाता, गया, गाझीपूर या शहरांवरून ते दिल्लीजवळ भारतीय वायुसेनेच्या हिंडन तळावर साडेपाच वाजेच्या सुमारास उतरले.

विमाने तातडीने रद्द

nशेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर एअर इंडिया, इंडिगोने सोमवारी ढाक्याला जाणारी त्यांची नियोजित उड्डाणे तातडीने रद्द केली.

nबांगलादेशातील संकट लक्षात घेता, आम्ही ढाका येथे होणारी आमची नियोजित उड्डाणे त्वरित प्रभावाने रद्द केली आहेत, असे कंपन्यांनी म्हटले आहे.

भारतातील खासदार म्हणतात...

बांगलादेशमधील घडामोडींबद्दल भारतातील अनेक खासदारांनी चिंता व्यक्त केली. त्या देशातील घटनांना सामोरे जाताना भारताचे हितसंबंध सुरक्षित राहतील, याची काळजी घेण्यात यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी म्हणाले की, बांगलादेशमध्ये स्थिती संवेदनशील आहे. त्याबाबत केंद्र सरकार संसदेच्या दोन्ही सभागृहांत निवेदन करेल अशी अपेक्षा आहे. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे विचलित न होता प. बंगालमधील जनतेने शांतता राखावी, चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहन  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.

Web Title: Why did Bangladesh burn? Crushing the students' agitation cost the government dearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.