इराणने हल्ल्यासाठी १२ ऑगस्टचाच दिवस का निवडला? इस्रायलला मोठी ठेच पोहोचवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 08:28 AM2024-08-05T08:28:57+5:302024-08-05T08:29:18+5:30
Iran Vs Israel: हानियेह यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, अमेरिकी सेंट्रल कमांडचे जनरल मायकेल कुरिला शनिवारी इस्रायलला पोहोचले.
तेहरान : इराणने हमासचा राजकीय विभागाचा प्रमुख इस्माईल हानियेह यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी या हल्ल्याला मान्यता दिल्याचे वृत्त असून, इराणचे सैन्य लवकरच इस्रायलवर हल्ला करू शकते, असे संकेत अमेरिकी, इसायली लष्करी अधिकाऱ्यांनी दिले.
हानियेह यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, अमेरिकी सेंट्रल कमांडचे जनरल मायकेल कुरिला शनिवारी इस्रायलला पोहोचले. त्यांच्या या दौऱ्याचे आधीच नियोजन केले जात असले तरी, इस्रायलच्या संरक्षणासाठी ताकद गोळा करण्याचे पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे. १२ ऑगस्टला (सोमवारी) इराण इस्रायलच्या तेल अवीववर हल्ला करू शकतो, असे संकेत अमेरिकी आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी दिले आहेत. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने इस्रायलला दुखावण्यासाठी 'तिशा बाव'चा दिवस निवडला आहे. हा दिवस इस्रायलसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि यामध्ये ज्यू लोक १२ ऑगस्टपासून सुरू होणारा उपवास १३ ऑगस्टपर्यंत पाळतात.
येमेनच्या हैती बंडखोरांचा क्षेपणास्त्र हल्ला
येमेनच्या हैती बंडखोरांनी एडनच्या आखातातून प्रवास करणाऱ्या लायबेरियन ध्वजांकित कंटेनर जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. इस्रायली हवाई हल्ल्याने त्यांना लक्ष्य केल्यापासून बंडखोरांनी केलेला हा पहिला हल्ला आहे.
गाझावरील इस्रायली हल्ल्यात १८ ठार
इस्रायली हल्ल्यात रविवारी पहाटे गाझामध्ये १८ जण ठार झाले. त्यात रुग्णालयाच्या संकुलातील तंबूच्या छावणीत उपचार घेणाऱ्या चार पॅलेस्टिनींचा समावेश आहे, तर पॅलेस्टिनीने केलेल्या हल्ल्यात तेल अवीव उपनगरात दोन जण ठार झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले की, इस्रायल बहु-आघाडीच्या युद्धात गुंतला आहे आणि देश संरक्षण किवा हल्ल्याच्या कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे.