जगातील सर्वात मोठा हिमनग अचानक का थांबला? २०२० पासून वाहत होता, ७३ किमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:16 IST2025-03-05T10:15:18+5:302025-03-05T10:16:31+5:30

A23a हा हिमनग महाकाय आहे, तो जॉर्जियाच्या दिशेने जात होता. या बेटांवर आदळेल किंवा तेथील उथळ पाण्यामध्ये अडकून पडेल अशी चिंता वाटत होती.

Why did the world's largest glacier suddenly stop? It had been flowing since 2020, 73 km... | जगातील सर्वात मोठा हिमनग अचानक का थांबला? २०२० पासून वाहत होता, ७३ किमी...

जगातील सर्वात मोठा हिमनग अचानक का थांबला? २०२० पासून वाहत होता, ७३ किमी...

जगातील सर्वात मोठ्या हिमनगाने जगाच्या चिंता वाढविल्या आहेत. A23a नावाचा हा हिमनग २०२० मध्ये अंटार्टिकापासून तुटून वेगळा झाला होता. तेव्हा पासून या विशालकाय हिमनगाने समुद्राच्या पाण्यात वाहण्यास सुरुवात केली होती. एक अब्ज टन एवढे अजस्त्र वजन असलेल्या या हिमनगाच्या वाहण्यामुळे दक्षिण जॉर्जिया बेटांना धोका निर्माण झाला होता. तो या बेटांना आदळण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतू हा हिमनग अचानक थांबल्याने शास्त्रज्ञ देखील आश्चर्यचकीत झाले आहेत. 

A23a हा हिमनग महाकाय आहे, तो जॉर्जियाच्या दिशेने जात होता. या बेटांवर आदळेल किंवा तेथील उथळ पाण्यामध्ये अडकून पडेल अशी चिंता वाटत होती. यामुळे पेंग्विनसारख्या प्राण्यांची भोजन व्यवस्था प्रभावित होण्याचा धोका होता. परंतू हा हिमनग गेल्या १ मार्चपासून दक्षिण जॉर्जिया हिमनगापासून ७३ किमी अंतरावर येऊन थांबला आहे. जर हा हिमनग याच जागी थांबून राहिला तर त्यामुळे वन्यजीवांना कोणताही धोका होणार नाही, असे ब्रिटिश अंटार्टिक सर्वे (BAS) चे शास्त्रज्ञ अँड्र्यू मेयर्स यांनी म्हटले आहे. 

महत्वाचे म्हणजे या हिमनगाचा १९ किमी एवढ्या लांबीचा एक तुकडा जानेवारीमध्ये या हिमनगापासून वेगळा झाला आहे. महासागराचे पाणी जसजसे हे हिमनग पार करतात तसतसे तेथील वाढत गेलेल्या तापमानामुळे बर्फ वितळू लागतो व या हिमनगाचे तुकडे होऊ लागतात. या हिमनगाचा १९ किमी लांबीचा तुकडा वेगळा झाला आहे. यामुळे या हिमनगाचे वस्तुमान बदलले आहे. जर हा हिमनग इथेच थांबून राहिला तर तेथील पाण्यात वेगवेगळे पोषक तत्व विरघळतील, त्याचा पेंग्विन, सील सारख्या प्राण्यांना फायदा होईल. या भागात जवळपास ५ दशलक्ष सील आणि ६५ दशलक्ष पक्षांचे वास्तव्य आहे. या जिवांना फायदा होऊ शकेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 

तापमान वाढीमुळे २००० सालापासून आतापर्यंत ६००० अब्ज टन बर्फ वितळला आहे. पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे.हे तापमान १.५ ते २ अंश सेल्सिअसने वाढले तर समुद्राची पातळी एवढी वाढेल की ती पु्न्हा कधीच सामान्य होऊ शकत नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या शतकाच्या अखेरीस मुंबईसारखी समुद्रालगतची शहरे पाण्याखाली जाण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. असे झाल्यास भारतावर मोठे संकट ओढवू शकते. 

Web Title: Why did the world's largest glacier suddenly stop? It had been flowing since 2020, 73 km...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.