लग्नासाठी मुलगी देता का मुलगी? भारतासह अनेक देशांत महिलांच्या कमी संख्येमुळे विवाह रखडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:59 PM2024-01-12T12:59:09+5:302024-01-12T13:02:44+5:30
चीन, तैवान आणि भारतातही अशीच स्थिती आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तरामुळे ही वेळ आल्याचे संशोधकांनी सांगितले.
ह्युस्टन: दक्षिण कोरियाचा बॅचलर टाइम बॉम्ब प्रत्यक्षात आता फुटण्याच्या मार्गावर आहे. जन्मावेळी स्त्री-पुरुष गुणोत्तरामध्ये ३० वर्षांचे ऐतिहासिक असंतुलन निर्माण झाल्याने देशातील तरुणांची संख्या तरुणींच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्यामुळे १९८० च्या नंतर जन्मलेल्या तब्बल ७ लाख ते ८ लाख “अतिरिक्त” दक्षिण कोरियन मुलांना लग्नासाठी दक्षिण कोरियन मुलगी शोधूनही मिळत नाहीये. याचा येथील समाजावर मोठा परिणाम होत आहे. चीन, तैवान आणि भारतातही अशीच स्थिती आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तरामुळे ही वेळ आल्याचे संशोधकांनी सांगितले.
कारण काय?
बहुतेक देशांमध्ये मुलींपेक्षा जास्त मुले जन्माला येतात. १९६० च्या दशकापासून द. कोरियाने जननक्षमतेत झपाट्याने घट अनुभवली. १९६० मध्ये प्रति स्त्री सहा मुलांवरून, १९७२ मध्ये चार मुलांवर जननक्षमता आली. १९८४ मध्ये ती दोन मुलांवर आली. २०२२ पर्यंत प्रजनन दर ०.८२ झाला. हा दर जगातील सर्वांत कमी प्रजनन दर आहे. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी किमान २.१चा दर आवश्यक आहे.
परदेशात वधू शोधा...
परदेशी जन्मलेल्या महिलांचे स्थलांतर करून हा असमतोल दूर करता येऊ शकतो. लोकसंख्याशास्त्रज्ञ याई ॲबेल आणि नायॉन्ग यांच्या संशोधनानुसार, द. कोरिया सरकार ईशान्य चीनमधील कोरियन महिला, व्हिएतनाम, फिलीपिन्समधील महिलांना लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.