१९७१ चा पराभव नाकारणाऱ्या पाकिस्तानी सत्तेवर समाजमाध्यमी का चिडलेत ?
By meghana.dhoke | Published: December 17, 2020 05:37 PM2020-12-17T17:37:29+5:302020-12-17T17:55:38+5:30
नव्या पिढीपासून वास्तव लपवलं, दडपून टाकलं, इतिहास नाकारला, अमूक एकालाच ‘वैरी’ मानत त्या नावाखाली सगळी झाकपाक केली तरी सत्य लपत नाही या वळणावर आता पाकिस्तानी तारुण्य उभं आहे.
‘हिस्ट्री मरती नहीं, वो बार बार जिंदा होकर सवाल करती हैं आज के हालात से, गुजरे वक्त का हिसाब मांगती हैं और आनेवाले कल का भी! वो हिसाब सहीं नहीं लगाया तो आनेवाली नस्लों को हिसाब चुकाना पडता हैं, हम वो ही चुका रहे हैं!’- ख्यातनाम पाकिस्तानी इतिहासतज्ज्ञ आणि राजकीय अर्थतज्ज्ञ डॉ. एस. अकबर झैदी दोन वर्षांपूर्वी कराची विद्यापीठात तरुण मुलांशी बोलत होते. सांगत होते की, ‘इतिहास’ नाकारला म्हणून तो बाद होत नाही, आपण झापडं लावली म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. जिवावर उदार होऊन कुणी इतकं ‘खरं’ बोलावं असा हा काळ नाही; पण डॉ. झैदी बोलले. ते आता आठवण्याचं कारण म्हणजे त्यांच्या याच वक्तव्याचं चित्र १६ डिसेंबरच्या निमित्तानं पाकिस्तानी समाजमाध्यमांत बुधवारी दिसलं. अनेक तरुण मुलं, विचारवंत, अभ्यासक, प्रागतिक विचाराचे स्त्री-पुरुष यांनी हिरीरीने मांडलं की, ४९ वर्षांपूर्वी आपल्या देशाचा तुकडा पडला आणि त्याला आपणच जबाबदार होतो हे मान्य करा. भारतीय कटकारस्थानांमुळे पूर्व पाकिस्तान तुटला, असा कितीही कांगावा केला तरी आपण आपला भूभाग गमावला, त्याला पाकिस्तानी सरंजामी वृत्ती आणि लष्करासह सत्ताधीशांच्या स्वार्थी महत्त्वाकांक्षाच जबाबदार आहेत हे मान्य करा. ‘नेशन इन डिनायल’ अर्थात पराभव झालाच नाही म्हणत कानावर हात ठेवण्याची वृत्ती पाकिस्तानला आजवर कशी महागात पडली आहे याविषयी अनेकांनी भरभरून लिहिलं. इतकंच नव्हे, तर १९७१ मध्ये बंगाली लोकांवर जे पश्चिम पाकिस्तानी लष्करानं जे अनन्वित अत्याचार केले त्याची माफी आपल्या सरकारने मागितली पाहिजे, अशी जाहीर मागणीही अनेकांनी समाजमाध्यमांवर केली. अर्थात त्यांना ट्रोल करणारे, तुम्हाला स्वत:च्या देशाविषयी प्रेमच नाही, कशाला ‘जलें पे नमक’ वगैरे म्हणणारेही होतेच.
मात्र ‘नाकारणं सोडा’ हाच मुद्दा अनेकांनी लावून धरला. एकीकडे डॉनसहित पाकिस्तानातील सर्व मुख्य प्रवाही माध्यमांनी १६ डिसेंबरचं अस्तित्वच नाकारल्यासारखं चित्र होतं. दुसरीकडे समाजमाध्यमात मात्र जनभावना वेगळी दिसत होती.
पाकिस्तानी अर्थशास्त्र प्राध्यापक आणि संगीतकार असलेल्या शहराम अझर यांनी स्वत:च्या आवाजात एक गाणं ट्वीट केलं. ‘इन्ही चलन से हम से जुदा बंगाल हुआ, पुछना इस दुख से जो दिल का हाल हुआ!’ त्यात ते पुढे म्हणतात की, बंगाल्यांचीच नाही तर बलूच, सिंधी, पश्तून भाषिकांशी सध्या आपण पाकिस्तानी जसे वागताे आहोत, त्याचीही माफी मागायला हवी. पत्रकार नायला इनायतही हाच मुद्दा मांडतात. त्यांनी हबीब जालीब या पाकिस्तानी क्रांतिकारी कवीच्या कवितेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणतात, ‘हसीं आखो, मधुर गीतों के सुंदर को खो कर (बांगलादेश), मै हैरां हूं वो, जिक्र ए वादी काश्मिर का करते है!’
आपल्याच राजकीय सत्तेसंदर्भातला हा संताप तिथं अनेकांनी मांडला. विशेषत: तरुण मुलांनी. आवेज कमाल नावाच्या एका तरुणानं १३ डिसेंबर १९७० मध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीचं छायाचित्र शेअर केलं आहे. त्या बातमीत नाव न देता एका पंजाबी पाकिस्तानी उद्योगपतीचं वक्तव्य आहे. त्यात ते म्हणतात, ‘पाकिस्तानी पंजाब संपला, उद्ध्वस्त झाला. आता सत्ता या सिंधी-बंगाल्यांच्या हाती जाणार, आम्ही त्या श्वानांची सत्ता मानायची का?’ पश्चिम पाकिस्तानातल्या जमीनदारांची सत्ता जाऊन पूर्वेतल्या गरीब, मागास लोकांच्या हाती सूत्र जाणार, हे कसं त्याकाळी स्थानिकांना पचलं नव्हतं हेच ती बातमी सांगते.
आवेज म्हणतो आजही पाकिस्तानात आपण ‘सकून ए बंगाल’ (फॉल ऑफ बांगलादेश) असं म्हणतो, दु:ख करतो, भारताला दोष देतो; पण बांगलादेशचं अस्तित्वच मान्य करीत नाही, हा दुटप्पीपणाच पुरेसा बोलका आहे.
हुसेन हकाकी हे २००८ ते २०११ दरम्यान अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत होते. त्यांनी १७ डिसेंबर १९७१ च्या डॉन वृत्तपत्राच्या मुखपृष्ठाचं छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे. त्यासह ते म्हणतात की, ‘दरवर्षी हा दिवस मला आठवण करून देतो की, कितीही नाकारलं तरी वास्तव बदलत नाही. १६ डिसेंबरला पाकिस्तानने शरणागती पत्करली हे वास्तव असताना १७ डिसेंबरला डॉनने विजय आपलाच होणार म्हणत हे वृत्त प्रसिद्ध केलं, तो विजय आजवर झाला नाही.’
४९ वर्षे आपण एकच वास्तव नाकारत आहोत, आपली सत्ता लबाडी करते हे आता तिथं नव्या पिढीच्या लक्षात येऊ लागलं आहे आणि ती पिढी आता सत्तेला घाबरून गप्प बसायला तयार नाही.
वास्तव आणि स्वीकार
या दोनच शब्दांभोवती काल पाकिस्तानी समाजमाध्यमं बोलत होती. नव्या पिढीपासून वास्तव लपवलं, दडपून टाकलं, इतिहास नाकारला, अमूक एकालाच ‘वैरी’ मानत त्या नावाखाली सगळी झाकपाक केली तरी सत्य लपत नाही या वळणावर आता पाकिस्तानी तारुण्य उभं आहे. आतातरी आपल्या स्थानिक वैविध्याची कदर करा असं तिथं तरुण समाजमाध्यमी उघड बोलू लागले आहेत.