फिनलँड सलग पाचव्यांदा ठरला सर्वात आनंदी देश, असं काय आहे या देशात अन् भारताचा क्रमांक कितवा? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 07:51 PM2022-03-20T19:51:02+5:302022-03-20T19:51:30+5:30
फिनलँड देश सलग पाचव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक आनंद निर्देशांकातील पहिले पाच सर्वात आनंदी देश आहेत.
फिनलँड देश सलग पाचव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक आनंद निर्देशांकातील पहिले पाच सर्वात आनंदी देश आहेत. त्याचवेळी, अफगाणिस्तान सर्वात दुःखी देशांमध्ये आहे. पण सर्वात आनंदी देशांच्या यादीत फिनलँड पहिल्या क्रमांकावर का कायम आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यासाठी हा अहवाल नेमका कसा तयार झाला हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, हा अहवाल तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ग्लोबल सर्व्हेचा डेटा वापरला आहे. जगातील 150 देशांचा जीडीपी, तेथील लोकांचे दीर्घायुष्य, सामाजिक समर्थन, स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचार अशा अनेक घटकांच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे.
फिनलँड इतका आनंदी का आहे? कारण फिनलँडमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी आहे. नैसर्गिक सौंदर्य अधिक आहे. गरिबीशी झगडणारे फार कमी लोक आहेत. याशिवाय इथली आरोग्य यंत्रणा उत्तम काम करते आणि समाजाची काळजी घेण्यासाठी उत्तम सरकारी सुविधा आहेत. हे फिनलँडच्या समृद्धीचे रहस्य आहे. हेलसिंकी टाइम्सच्या अहवालानुसार, फिनलँड हा पाश्चात्य देशांच्या तुलनेत राहण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम देश आहे. येथील लोकांना शांततापूर्ण जीवन जगणं आवडतं, त्यामुळे येथे राहिल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते. याशिवाय फिनलँडची संस्कृतीही या देशाला आनंदी ठेवण्यास मदत करते. अहवालानुसार, येथील संस्कृतीमध्ये एकमेकांना मदत करणं हे समाविष्ट आहे, हे देखील आनंदाचं एक रहस्य आहे.
इतकेच नाही तर फिनलँडमध्ये गुन्ह्यांच्या नगण्य घटनांमुळे येथील लोक स्वतःला अधिक सुरक्षित समजतात. याशिवाय येथील शिक्षण व्यवस्था चांगली असून तरुणांना येथे अधिक संधी मिळतात. यामुळेच येथे बेरोजगारीची चर्चा होत नाही. संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत भारत 136 व्या स्थानी आहे. आर्थिक महासत्ता अमेरिका या क्रमवारीत 16 व्या आणि ब्रिटन 17 व्या क्रमांकावर आहे. या यादीत भारत 136 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वेळी भारताचा क्रमांक 139 वा होता. विशेष म्हणजे शुक्रवारी जाहीर झालेल्या या यादीत पाकिस्तान हॅपिनेस इंडेक्स यादीतील नंबर 121 व्या क्रमांकावर आहे. तर भारताचा क्रमांक 136 वा आहे.