हमासनं इस्रायलवर का केला हल्ला, बायडेन यांनी सांगितलं कारण...; भारताचं आहे कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 02:17 PM2023-10-26T14:17:33+5:302023-10-26T14:18:17+5:30
बायडेन यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा अँगल दिला आहे.
इस्रायल आणि हमास युद्धाला अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी भारताचा अँगल दिला आहे. हमासने इस्रायलवर दहशतवादी हल्ला करण्यामागचे एक कारण, नुकतेच नवी दिल्ली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान महत्त्वाकांक्षी भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरसंदर्भात करण्यात आलेली घोषणा असल्याचे ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. ही योजना संपूर्ण भागाला रेल्वे नेटवर्कने जोडते.
बायडेन यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा अँगल दिला आहे. याचवेळी आपल्याकडे याचा कुठलाही पुरावा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या 7 ऑक्टोबरला हमास या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 1,400 हून अधिक लोक मारले गेल्यानंतर, इस्रायलने हमासविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे.
बायडेन म्हणाले, ''मला खात्री आहे की हमासने हल्ला करण्यामागे हे देखील एक कारण होते. यासंदर्भात माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही. मात्र माझी अंतरात्मा मलाहे सांगते आहे.'' याच वेळी आम्ही ते काम ते काम सोडू शकत नाही, असेही बायडेन यांनी म्हटले आहे. हमासच्या दहशतवादी हल्ल्यामागील सभाव्य कारणाच्या स्वरुपात भारत-मध्य पूर्व-यूरोप आर्थिक कॉरिडॉरचा (आयएमईईसी) उल्लेख करण्याची ही बायडेन यांची एकाच आठवड्यातील दुसरी वेळ आहे.
या आर्थिक कॉरिडॉरसंदर्भात अमेरिका, भारत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीरात, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि यूरोपीय संघातील नेत्यांनी संयुक्तपणे घोषणा केली होती.