कॅनडात का होतंय 'स्वस्तिक' बॅन? कॅनडाई सरकारविरोधात भारतीयांचं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 12:17 PM2022-02-19T12:17:42+5:302022-02-19T12:19:09+5:30
गेल्या काही दिवसांपासून कॅनडात शेकडो ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. कॅनडाची राजधानी ओटावा येथे आंदोलक ट्रकचालकांनी चक्का जाम केला आहे.
कॅनडाई सरकारने हिंदूंचं प्रतिक असलेल्य स्वस्तिकवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत अद्याप सरकारने अंतिम निर्णय घेतला नाही. पण, कॅनडा सरकारला यावरुन अनेकांकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. स्वस्तिक प्रतिकाच्या वापरावर बंदी आणण्याचा विचार कॅनडा सरकारने सुरू केला, तेव्हापासून सरकारला विरोधाचा सामना करावा लागत आहे. सरकारने कॅनडाच्या संसदेत याबाबतचे एक विधेयकही सादर केले आहे.
न्यू डेमोक्रेटिक पार्टी म्हणजेच एनडीपीचे नेता जगमीत सिंह यांच्या समर्थनातील सदस्यांनी हे विधेयक आणले. त्यामुळे, भारत-कनाडाई समुदायात तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे. अमेरिकेतील एका प्रमुख हिंदू संघटनेनं कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो आणि विधेयकाचं समर्थन करणारे मूळ भारतीय वंशाचे नेते जगमीत सिंह यांच्याकडे आग्रह धरला. त्यामध्ये, हिंदूंसाठी प्राचीन आणि शुभ प्रतिक मानण्यात येणारे स्वस्तिकला हकेनक्रेझसोबत ग्राह्य धरु नये. हकेनक्रेझ हे एक स्वस्तिकसारखे दिसणारे प्रतिक आहे. जे 20 व्या शतकापासून वापरण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कॅनडात शेकडो ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. कॅनडाची राजधानी ओटावा येथे आंदोलक ट्रकचालकांनी चक्का जाम केला आहे. या आंदोलनात आंदोलक तथाकथित स्वस्तिक आणि कॉन्फेडरेट झेंडे फडकवण्यात आले आहेत. या घटनेनंतर न्यू डेमोक्रेटीक पक्षाचे नेते जगमीत सिंह यांनी 2 फेब्रुवारी रोजी ट्वटि करुन लिहिले आहे की, स्वस्तिक आणि कॉन्फेडरेट झेंड्याला कॅनडात काहीही महत्व नाही. कॅनडात तिरस्काराच्या प्रतिकांना प्रतिबंध करण्याची ही वेळ आहे. आपल्या सर्वांनी एकत्र येऊन हे निश्चित केले पाहिजे की, समाजात तिरस्कार व द्वेष भावनेला काहीही स्थान नाही.
दरम्यान, याप्रकरणी हिंदूपॅक्ट (हिंदू पॉलिसी रिसर्च एंड एडवोकेसी कलेक्टिव) ने टुड्रो आणि सिंह यांना आग्रह केला आहे की, सरकारने हिंदू, बौद्ध, शीख आणि जगभरातील अनेक स्वदेशी समुदायांसाठी प्राचीन प्रतिक असलेलं स्वस्तिक हकेनक्रेज यासोबत जोडू नये. टोरंटो येथील भारत सरकारच्या अधिकारी रागिनी शर्मा यांनीही उत्तर दिले आहे. भारताचे महावाणिज्यदूत अपूर्व श्रीवास्तव म्हणाले की, याबाबत औपचारिकपणे कॅनडाशी आपण संवाद साधला आहे. तेथील लिबरल पार्टीचे खासदार चंद्र आर्य हे हा मुद्दा हाऊस ऑफ कॉमनमध्ये उठवतील असेही त्यांनी सांगितले.