पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ दौरा का महत्त्वाचा आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 02:39 PM2018-05-11T14:39:23+5:302018-05-11T14:39:23+5:30
पंतप्रधानपदी आल्यापासून मोदी यांची गेल्या चार वर्षातील ही तिसरी नेपाळ भेट आहे. दोन वर्षांपुर्वी मधेसी समुदायाच्या निदर्शनांनंतर तयार झालेल्या कोंडीनंतर दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आणि तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते.
काठमांडू- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा नेपाळ दौरा आज सकाळपासून सुरु झाला आहे. पंतप्रधानपदी आल्यापासून मोदी यांची गेल्या चार वर्षातील ही तिसरी नेपाळ भेट आहे. दोन वर्षांपुर्वी मधेसी समुदायाच्या निदर्शनांनंतर तयार झालेल्या कोंडीनंतर दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आणि तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते. मात्र या भेटीनंतर त्या कोंडीमुळे निर्माण झालेला तणाव निवऴेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नेपाळने नुकताच चीनला बुधी-गंडकी हायड्रोइलेक्टीकल प्रोजेक्ट या 2.3 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या प्रकल्पाला नकार दिला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली अरुण 3 या प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा प्रकल्प 900 मेगावॅट ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेचा असेल. हा प्रकल्प संखुवासभा या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प तयार होण्यास पाच वर्षांचा कालावधी जाईल आणि त्यासाठी 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.या प्रकल्पामुळे भारत आणि नेपाळला वीज मिळणार आहे.
मोदींच्या भेटीमुळे भारत आणि नेपाळ यांना रेल्वेने जोडण्याच्या प्रकल्पालाही गती मिळणार आहे. बिहारमधील राक्सौल आणि नेपाळची राजधानी काठमांडू यांना जोडण्याची घोषणा ओली यांच्या भारतदौऱ्याच्यावेळएस करण्यात आली होती. या वर्षअखेरीस त्याचे सर्वेक्षण पूर्ण होणार आहे. नेपाळवरील भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी चीननेही तिबेट व नेपाळ यांच्यामध्ये रेल्वेमार्गाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याला शह देण्यासाठी भारतातर्फे अशा रेल्वेमार्गाची पूर्तता लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. भारताने नेपाळसह भूतानलाही रेल्वेने जोडण्याची तयारी चालवलेली आहे.
रेल्वेमार्गांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी ओली यांच्याबरोबर अंतर्गत जलवाहतुकीवर चर्चा करणार आहेत. तसेच कृषीविषयक मुद्द्यांवरही नेपाळ आणि भारत यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. याबरोबरच पंचेश्वर बहुउद्देशिय धरण प्रकल्पही दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या चर्चेत समाविष्ट असेल. नेपाळवर गेली अनेक दशके चीन आपला प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताचा प्रभाव कमी करुन नेपाळमध्ये शिरकाव करण्यासाठी चीन विविध मार्गांचा वापर करत आहे.