तालिबानी नेता दहशतवादी का नाही!
By admin | Published: September 16, 2016 01:22 AM2016-09-16T01:22:52+5:302016-09-16T01:22:52+5:30
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित लोकांच्या यादीत तालिबानी नेत्याचा दहशतवादी म्हणून समावेश करण्यात न आल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे
संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधित लोकांच्या यादीत तालिबानी नेत्याचा दहशतवादी म्हणून समावेश करण्यात न आल्याबद्दल भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. या तालिबानी नेत्याला दहशतवादी घोषित न करणे हे एक रहस्यच आहे, असे भारताने म्हटले आहे.
यासोबतच भारताने पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढविला. अफगाणिस्तानमध्ये हिंसाचाराचा कट रचणाऱ्या लोकांना त्यांच्याच शेजारी सुरक्षित स्थळ मिळू नये, असे भारताने स्पष्ट केले. सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानच्या संदर्भात सुरू असलेल्या एका चर्चेत बोलताना भारताचे स्थायी उपप्रतिनिधी तन्मय लाल म्हणाले, ‘तालिबान या प्रतिबंधित संघटनेच्या नेत्याला दहशतवादी म्हणून घोषित न करणे हे आमच्यासाठी एक रहस्य बनलेले आहे. संयुक्त राष्ट्राने घेतलेल्या या भूमिकेमागची कारणे आम्हाला कळू शकतील काय?’
गेल्या मे मध्ये मुल्ला मुहम्मद मंसूर हा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्यानंतर तालिबानने मौलवी हैबतुल्ला अखुंदजादा याला आपला नवा नेता घोषित केले होते. परंतु अखुंदजादा याचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत कुठेही नाही, हे विशेष. एका प्रतिबंधित संघटनेच्या प्रमुखाला दहशतवादी घोषित न करून वैश्विक संस्था शांती आणि सुरक्षेच्या समक्ष उभ्या ठाकलेल्या सर्वांत मोठ्या धोक्याचा (दहशतवाद) सामना कसा करणार, असा सवालही लाल यांनी उपस्थित केला. (वृत्तसंस्था)