'या' देशातील लोकांचे वजन का कमी होत आहे?
By अोंकार करंबेळकर | Published: August 21, 2018 10:20 AM2018-08-21T10:20:38+5:302018-08-21T10:23:19+5:30
फसलेले निर्णय, एकाधिकारशाहीमुळे एकेकाळी संपन्न असणाऱ्या या देशाच्या नागरिकांना खाण्यापिण्यासाठीही अन्न उरलेले नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या देशात २०१८ वर्ष संपेपर्यंत १० लाख टक्के इतका चलनवाढीचा दर असेल असे भाकीत केले आहे.
मुंबई- एखाद्या घरामध्ये चुकीचे निर्णय, व्यसन, उधळपट्टी, आर्थिक संकट किंवा अपघातामुळे आर्थिक घडी बिघडल्याचे तुम्ही पाहिले असेल आपल्या डोळ्यांदेखत त्या घराची, कुटुंबाची वाताहत झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आपल्या जगात एका देशाची सध्या अशी अवस्था झाली आहे. फसलेले निर्णय, एकाधिकारशाहीमुळे एकेकाळी संपन्न असणाऱ्या या देशाच्या नागरिकांना खाण्यापिण्यासाठीही अन्न उरलेले नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या देशात २०१८ वर्ष संपेपर्यंत १० लाख टक्के इतका चलनवाढीचा दर असेल असे भाकीत केले आहे.
हा देश आहे व्हेनेझुएला. २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात जगातील सर्व भांडवलशाही अर्थव्यवस्थांना तोडीस तोड उत्तर देत या देशाने आपली अर्थव्यवस्था बळकट केली होती. मात्र आज या देशातील लोकांकडे पोट भरण्यासाठीही पैसे नाहीत. बेसुमार चलनवाढीमुळे साधा ब्रेड किंवा अंडे विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे. गेल्या वर्षभरात या देशातील लोकांचे सरासरी ११ किलो वजन कमी झाले आहे. आता कचऱ्यामध्ये अन्न शोधून खाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
व्हेनेझुएलावर ही स्थिती का ओढावली?
१९९९ साली ह्युगो चावेज व्हेनेझुएलाच्या सत्तेवर आले.तेव्हा जगातील सर्वात जास्त तेल साठा असणाऱ्या म्हणजे व्हेनेझुएलाच्या अर्थकारणाची दिशा ठरवण्याची संधी मिळाली. समाजवादी विचारांच्या चावेज यांनी सर्व अर्थव्यवस्था तेलावर आधारीत यार करायला घेतली. मिळालेल्या प्रत्येक पैशाचा उपयोग गरिबांसाठी करु अशा घोषणा त्यांनी केल्या. गरिबांना तशी मदत केलीही. अन्न, औषधे या सगळ्यावर सबसिडी दिली, शिष्यवृत्त्या दिल्या, जमिन सुधारणा कायदे केले. तेलामुळे आपला देश चालतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी उद्योगांचे सरकारीकरण करायला घेतले. देशातील खासगी उद्योगांचे पूर्ण कंबरडे मोडून झाल्यावर तेलाच्या पैशावर सर्व वस्तू आयात करणे सुरु केले. पण तेलाच्या किंमती अस्थिर असतात, तमया कधीही बदलू शकतात याची त्यांनी कधीच काळजी केली नाही. सत्तेत राहाण्यासाठी लोकप्रिय योजना तोटा सहन करुन सुरुच ठेवल्या.
मात्र २०१३ साली चावेज यांचे कॅन्सरने निधन झाले. चावेज यांचे निधन झाल्यावर १०० डॉलरच्या वर गेलेले तेलाचे भाव पुढच्याच वर्षी कोसळले. इथेच व्हेनेझुएलाच्या संकटांना सुरुवात झाली. चावेज यांचा मृत्यू आणि तेलाच्या दराची घसरण अशी दोन संकटे या देशावर आली.
VENEZUELA collapses. Buying groceries in #Venezuela is a logistical challenge if you handle it with cash, a chicken can cost you about 14 million of bolívares, something more than two dollars.
— SebastianPosada (@zebposada) August 21, 2018
Products and their equivalent in cash money.
That's Castro's legacy.#SOSVenezuelapic.twitter.com/X1LcUdQaO7
चावेज यांच्या निधनानंतर राष्ट्राध्यक्षपदी आलेले निकोलस मडुरो हे सुद्धा एक संकटच मानावे लागेल. केवळ चावेज यांच्या सावलीत वाढलेल्या निकोलस मडुरो यांना व्हेनेझुएलाची स्थिती सुधारण्यासाठी काहीही करता आले नाही, इतकेच नव्हे तक व्यक्तीगत महत्त्वांकाक्षेमुळे मडुरो देशाला एकाधिकारशाहीकडे घेऊन गेले. आपल्या मर्जीने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश नेमणे, घटनेत फेरफार करणे, भ्रष्टाचारी प्रवृत्तींना पाठबळ देणे, जनमताला अव्हेरुन आपल्या मनानुसार सरकार चालवणे, अन्न-औषधांची मागणी करणाऱ्या लोकांवरच हल्ले करणे असले उद्योग मडुरोनी सुरु ठेवले आहेत. सर्व कपडे, अन्न, औषधे आयात होत असल्यामुळे त्याचे वाटप आता लष्कराच्या हातात देण्यात आले आहेत.
केवळ काही लोकांसाठी डॉलर स्वस्त ठेवण्यात आला असून इतरांसाठी त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्त किंमत द्यावी लागते. यामुळे तेथे काळाबाजार आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे.
आज व्हेनेझुएलाची स्थिती अधिकच चिघळली असून याला मुख्यत्त्वे मडुरो जबाबदार असल्याचे मानले जाते. परकीय चलनाची कोणतीही सुरक्षित गंगाजळी नसणारा व्हेनेझुएला पूर्ण मोडून पडला आहे. या सगळ्या परिस्थितीत भर म्हणून अमेरिकेने व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
इतकी वाईट स्थिती होऊनही आपल्याकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा फॉर्म्युला आहे, या अर्थव्यवस्थेत चमत्कार घडून ती पूर्वपदावर येईल अशा वल्गना करत चावेज यांनी लोकांना माझ्यावर विश्वास ठेवा असे लोकांना आवाहन केले आहे.