दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच साहित्याचे नोबेल होणार रद्द?, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 03:17 PM2018-04-30T15:17:27+5:302018-04-30T15:22:50+5:30
संपूर्ण जगाचे लक्ष ज्या पुरस्कारांकडे लागलेले असते त्या नोबेल पुरस्कारांमधील साहित्याचे नोबेल यंदाच्या वर्षी वगळले जाऊ शकते.
स्टॉकहोम- संपूर्ण जगाचे लक्ष ज्या पुरस्कारांकडे लागलेले असते त्या नोबेल पुरस्कारांमधील साहित्याचे नोबेल यंदाच्या वर्षी वगळले जाऊ शकते. स्वीडिश अकादमीच्या एका माजी सदस्याच्या पतीविरोधात लैंगिक छळ आणि पिळवणुकीचा आरोप झाल्यानंतर अकादमीच्या सहा सदस्यांनी एकत्र पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा साहित्याचे नोबेल रद्द केले जाऊ शकते.
फ्रेंच छायाचित्रकार जीन क्लाऊड अर्नाल्टने अकादमीचे माजी सदस्य कॅटरिना फ्रॉस्टेन्सॉन हीच्याशी विवाह केला होता. जीनवर 18 महिलांबरोबर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. हा सगळा छळाचा प्रकार स्वीडिश अकादमीच्या इमारतींमध्येच झाला होता.
18 सदस्यांच्या समितीने या घटनेनंतर कॅटरिना फ्रॉस्टेन्सॉन यांना पदावरुन दूर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इतर सदस्यांनीही याविरोधात राजीनामे दिले. अकादमीचे सदस्य हे आजन्मकाळासाठी निवडले जात असल्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या राजीनाम्याला अर्थ नाही, अकादमी काही काळ आपले कामकाज स्थगित करु शकते, असे स्वीडिश अकादमीच्या अध्यक्षा सारा डॅनियस यांनी सांगितले. जीनच्या विरोधात कॅटरिना आणि 18 महिलांनी तक्रार केली असून त्या तक्रारींनुसार पोलीस चौकशी सुरु आहे. अर्नाल्ट स्टॉकहोम लिटररी क्लब चालवतो आणि यातील बहुतांश घटना नोबेल संस्थेशी संबंधीत इमारतींमध्ये झालेल्या आहेत. या आरोपांमुळे अकादमीच्या मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत.