घरासोबत पत्नी फ्री, इंडोनेशियाच्या महिलेची भन्नाट जाहिरात
By Admin | Published: March 11, 2015 04:01 PM2015-03-11T16:01:05+5:302015-03-11T16:35:56+5:30
घर विकत घ्या...सोबत पत्नी फ्री.. इंडोनेशियातील वेबसाईटवर झळकलेली ही जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
>ऑनलाइन लोकमत
जकार्ता, दि. ११ - घर विकत घ्या...सोबत पत्नी फ्री.. इंडोनेशियातील वेबसाईटवर झळकलेली ही जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. घरमालक महिला विधवा असून सध्या ती लग्नासाठी मुलगा शोधत आहे. यासाठी महिलेच्या प्रॉपर्टी एजंटने ही भन्नाट जाहिरात दिली असून या जाहिरातीवरुन महिलेवर टीकाही सुरु झाली आहे.
इंडोनेशियातील स्लेमान येथे राहणारी ४० वर्षीय विना लिया ही विधवा असून त्यांचा ब्यूटी पार्लरचा व्यवसाय आहे. स्लेमान येथे महिलेचे एक मजली घर असून घरात दोन बेडरुम, दोन बाथरुम, पार्किंगसाठी जागा आणि माश्यांसाठी छोटेसे तळे देखील आहे. या घराची किंमत ७५ हजार डॉलर्स ऐवढी आहे. या महिलेला हे घर विकायचे असून घर विकण्यासाठी तिने तिच्या प्रॉपर्टी एजंट मित्राची मदत घेतली. संबंधीत महिला सध्या दुस-या लग्नाच्या विचारात असून यासाठी योग्य वराचा शोधही सुरु आहे. महिलेच्या प्रॉपर्टी एजंटने नेमका हाच मुद्दा जाहिरातीमध्ये टाकला आहे. 'दुर्मिळ संधी, जेव्हा तुम्ही हे घर विकत घ्याल, तुम्ही घर मालकीणला लग्नासाठीही विचारु शकता' अशी जाहिरात इंडोनेशियातील वेबसाईट्सवर टाकली. जाहिरातीमध्ये लियाचे फोटोही टाकण्यात आले होते. अवघ्या काही तासांमध्येच ही जाहिरात इंडोनेशियामध्ये चर्चेचा विषय ठरली असून अनेक इच्छुकांनी लियाशी संपर्क साधला. 'मला ऐवढा प्रतिसाद येईल अशी अपेक्षा नव्हती. मुळात प्रॉपर्टी एजंटने ही जाहिरात टाकल्याची मला कल्पनाही दिली नव्हती' असे लियाने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले. मुस्लिमबहुल इंडोनेशियात महिलेने अशी जाहिरात दिल्याने कट्टरतवादी संघटनांनी तिचा निषेधही दर्शवला आहे. लियाला दोन लहान मुले असून या जाहिरातीनंतर पोलिसांनी तिची चौकशीही केली.