Monkey Attack: पोलीस आता चोरांचा नव्हे तर माकडांचा शोध घेणार, जाणून घ्या प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 05:52 PM2022-07-27T17:52:58+5:302022-07-27T17:53:33+5:30
नक्की कोणत्या भागात घडलाय हा धक्कादायक प्रकार, वाचा सविस्तर
Monkey Attack, Police in action: कोणत्याही देशात किंवा परिसरात सहसा पोलीस हे चोरांच्या मागावर असतात. पोलीसांना चोरांना पकडण्याचे मुख्य काम दिलेलं असतं. पण जपानमध्ये आता पोलिसांनामाकडांचा मागोवा घ्यावा लागणार आहे. जपानमधील लोक माकडांच्या दहशतीमुळे खूप हैराण आहेत. अशा परिस्थितीत आता त्यांना लगाम घालण्यासाठी जपानी पोलीस मैदानाक उतरले आहेत. जंगली माकडांचे हल्ले रोखण्यासाठी 'ट्रँक्विलायझर' गन म्हणजे प्राण्यांना दुखापत न होता बेशुद्ध करणारी बंदुक वापरली जाणार आहे.
जपानच्या यामागुची शहरात गेल्या काही आठवड्यात माकडांच्या हल्ल्यात ४२ जण जखमी झाल्याची नोंद आहे. यामध्ये लहान मुले आणि वृद्धांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या हल्ल्यांसाठी जपानी माकडांना जबाबदार धरले जात आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, या माकडांची दहशत देशाच्या मोठ्या भागांमध्ये एक सामान्य गोष्ट आहे, परंतु अशा घटना आता असह्य होऊ लागल्या आहेत. शहराच्या एका अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले की सध्या अतिशय कमी कालावधीत माकडांकडून होणारे हल्ले फारच घातक आहेत. सुरुवातीला फक्त लहान मुले आणि महिलांवरच हल्ले झाले होते. आता अलीकडे वृद्ध आणि प्रौढ पुरुषांनाही लक्ष्य केले जात आहे, हे भयावह आहे.
शहरात जुलै महिन्याच्या सुरुवातीला या जंगली माकडांना जाळ्या लावून पकडण्यात पोलिसांना अपयश आले होते. या हल्ल्यात जखमींवर वेगवेगळ्या जखमा आढळून आल्याने हा हल्ला एकाच माकडाने केला आहे की अनेक माकडे एकावेळी हल्ला करत आहेत, याचीही खात्री पोलिसांना देता येत नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, जखमींच्या पाय, हात, मान आणि पोटावर ओरखडे आढळले आहेत. अपार्टमेंटमध्ये घुसून चार वर्षांच्या मुलीवर माकडांनी हल्ला केला. यामध्ये मुलीला खूप त्रास सहन करावा लागला. दुसर्या हल्ल्यात माकडाने शाळेतील एक संपूर्ण वर्गच उद्ध्वस्त केला होता.