ती लिहिणार दहा लाख पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:14 AM2017-07-27T03:14:01+5:302017-07-27T03:14:05+5:30
एकमेकांशी संपर्क साधण्याची अनेक साधने असली तरी आणि त्यापैकी काही क्षणांत दुसºया व्यक्तीशी जोडणारी असली तरी लिहिण्यातून जो जिव्हाळा निर्माण होतो त्याला कशाचीही सर नाही
एकमेकांशी संपर्क साधण्याची अनेक साधने असली तरी आणि त्यापैकी काही क्षणांत दुसºया व्यक्तीशी जोडणारी असली तरी लिहिण्यातून जो जिव्हाळा निर्माण होतो त्याला कशाचीही सर नाही. मोबाइल फोनमधील मेसेजेस किंवा टिष्ट्वटरद्वारे तुमचे म्हणणे समोरच्या व्यक्तीपर्यंत तत्काळ पोहोचते हे खरे. त्या तुलनेत पत्र लिहिण्याला वेळ लागतो हेही खरे. तरीही एका महिलेने थोडेथोडके नव्हे तर दहा लाख पत्र लिहिण्याचा निर्धार केला आहे.
जोडी अॅन बिकले (२८) या कवयत्री असून त्यांनी ज्या लोकांना कधी का असेना सल्ला किंवा मदतीची गरज आहे त्यांना ही पत्रे लिहिण्याचे ठरवले आहे. जीवन किती कठीण असते याची जाणीव जोडी यांना आहे. जोडी २३ वर्षांच्या असताना त्यांना गोचीडाने चावा घेतला होता. त्यातून त्यांना एन्सेफलॅटिस झाला. (एन्सेफलॅटिसची बाधा गोचीड चावलेल्या दोन लाख लोकांतून एकाला होत असते). त्या आजाराने त्यांना हृदयविकाराचा झटका आला व अर्धांगवायू झाला. त्यामुळे त्यांना आत्महत्या करावीशी वाटली. परंतु त्यातून त्या कशाबशा बाहेर पडल्या.
आता त्यांनी आयुष्यात अशाच कठीण प्रसंगांना तोंड देत असलेल्यांना मदत करण्याचा ध्यासच घेतला आहे. त्यांचा हा प्रकल्प आहे ‘एक दशलक्ष प्रेमपत्रे’. जोडी यांना वयाच्या ११ वर्षांपासूनच अनोळखी व्यक्तींना पत्रे लिहिण्याची सवय आहे. तुम्ही त्यांच्या वनमिलियनलव्हलेटर्सअॅटदरेटजीमेलडॉटकॉमवर पत्र पाठवून मला पत्र पाठवा, असे म्हणू शकता. ईमेलवर त्यांना अशी किती तरी पत्रे येत असतात. त्यामुळे तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल.