कुत्री-मांजरं ऑफिसात आणू, अन्यथा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:23 AM2021-08-10T05:23:15+5:302021-08-10T05:23:35+5:30

कोविडनंतरच्या काळात यासंदर्भात आजवर अनेक लहान-मोठी सर्वेक्षणं, अभ्यास झाले आहेत. या प्रत्येक अभ्यासाचा निष्कर्ष हेच सांगतो, की अत्यंत कठीण काळात कर्मचाऱ्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांनी साथ दिली, आता ते आपल्या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर सोडून जाऊ शकत नाहीत.

will Bring dogs and cats to the office otherwise resign | कुत्री-मांजरं ऑफिसात आणू, अन्यथा राजीनामा

कुत्री-मांजरं ऑफिसात आणू, अन्यथा राजीनामा

googlenewsNext

काही  दिवसांपूर्वीच आझुसेनिसला कंपनीकडून ईमेल आला.  त्यात ‘सब्जेक्ट’मध्ये सुरुवातीलाच ठळक अक्षरात लिहिलेलं होतं, ‘अपडेट’.. पुढे वाचायच्या आधीच त्याला कळलं, या ईमेलमध्ये काय लिहिलेलं असेल आणि त्यानं एक मोठ्ठा आवंढा गिळला. अनेक महिन्यांपासून ज्या शब्दाची वाट तो पाहात होता, तो शब्द शेवटी आलाच.. तोही ठळक अक्षरात, कॅपिटल लेटर्समध्ये.. RETURN.. काय करावं त्याला सुचेना. अचानक तो स्तब्ध, हतबल झाला. त्याच्या डोक्यांत विचारांची चक्रं फिरू लागली..

२४ वर्षीय तरुण आझुसेनिस एका बँकेत ‘फायनान्शिअल ॲनालिस्ट’ म्हणून काम करतो. कोरोनामुळे गेलं वर्षभर तो ‘वर्क फ्रॉम होम’ करीत होता. गेल्या वर्षीपासून बँकेत जाणं बंद झालं आणि अचानक तो सैरभैर झाला. सोमवार ते शुक्रवार रोज दिवसाचे बारा-बारा तास तो घरी काम करीत असला, तरी त्याला एकदम एकटं एकटं, निराश वाटायला लागलं. या एकटेपणावर मात करण्यासाठी त्यानं ‘फिनले’ नावाची एक छोटीशी कुत्री आणली. दिवसभर कामात व्यस्त असला, तरी आता त्याचा दिवस मजेत जाऊ लागला. विकेंडचे दोन्ही दिवस तर तिच्याबरोबर घालवताना तो आपला एकटेपणा पूर्णपणे विसरला. या संपूर्ण वर्षभराच्या काळात फिनलेनं त्याला प्रचंड साथ दिली. आझुसेनिसचं तर म्हणणं, फिनले नसती, तर या वर्षभरात एकटेपणानं मला अक्षरश: खाऊन टाकलं असतं...

आझुसेनिसला आता चिंता होती, ती फिनलेची. तो ऑफिसमध्ये गेल्यावर तिची काळजी कोण घेणार? तिला खाऊपिऊ कोण घालणार, तिला फिरायला कोण नेणार?... या विचारांनी तो अतिशय अस्वस्थ, बेचैन झाला होता..

पण, असं वाटणारा आझुसेनिस एकटाच नव्हता, नाही. त्याच्यासारखे हजारो लोक अमेरिकेत आणि इतर देशांत आहेत. काेरोनाचा पहिला मोठा उद्रेक संपल्यानंतर अनेक लोक आता कामावर जाऊ लागले आहेत किंवा कंपन्यांनी त्यांना प्रत्यक्ष कामावर हजर राहण्यासाठी सांगितलं आहे.! आता काय करायचं, हा प्रश्न साऱ्यांसमोरच उभा राहिला आहे. कारण कोरोनाकाळातील एकाकीपणा आणि उदासी घालवण्यासाठी त्यांनी अनेक पाळीव प्राण्यांचा आधार घेतला होता. कोणी कुत्री पाळली तर कोणी मांजरं..!

ऑफिसात कामाला जायला लागल्यावर त्यांची देखभाल कोण करणार, हा मोठ्ठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. अनेकांसमोर केवळ एकच पर्याय उरला आहे. त्यांनी आपापल्या कंपन्यांना आणि बॉसला सरळ सांगितलं आहे, आम्हाला “वर्क फ्रॉम होमच करू द्या, नाहीतर आमच्या ‘पेट’ला आमच्याबरोबर ऑफिसात घेऊन येऊ द्या.. अन्यथा हा घ्या आमचा राजीनामा.. आम्ही दुसरी नोकरी शोधतो!”

अनेक कंपन्यांपुढेही त्यामुळे मोठा प्रश्न पडला आहे : कर्मचाऱ्यांना घरूनच काम करायला मुभा द्यायची की त्यांच्या पाळीव प्राण्यांना  ऑफिसात आणायची परवानगी द्यायची? अनेक कंपन्यांनी तडजोड स्वीकारलीय. आपली ‘हुशार माणसं’, प्रशिक्षित मनुष्यबळ सहजासहजी दुसरीकडे जाऊ देण्यापेक्षा त्यांनी या कर्मचाऱ्यांची विनंती मान्य केली आहे.  काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ मंजूर केलं आहे, तर अनेकांनी त्यांचे पाळीव प्राणी त्यांच्यासोबत ऑफिसात आणायची परवानगी दिली आहे. त्यासाठी वेगळी व्यवस्था उभारायलाही सुरुवात केली आहे. या प्राण्यांना ‘नैसर्गिक’ वातावरणात राहता येईल, आपल्या मालकालाही भेटता  येईल, तसंच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करता येईल याची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही, अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘पेट टाइम’ही देऊ केला आहे. म्हणजे तेवढ्या वेळात कर्मचाऱ्यांना आपल्या पाळीव प्राण्यांना भेटता येईल, त्यांच्याशी खेळता येईल, त्यांना खाऊ-पिऊ घालता येईल! 

कोविडनंतरच्या काळात यासंदर्भात आजवर अनेक लहान-मोठी सर्वेक्षणं, अभ्यास झाले आहेत. या प्रत्येक अभ्यासाचा निष्कर्ष हेच सांगतो, की अत्यंत कठीण काळात कर्मचाऱ्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांनी साथ दिली, आता ते आपल्या पाळीव प्राण्यांना वाऱ्यावर सोडून जाऊ शकत नाहीत. गेल्या वर्षी झालेला एक अभ्यास सांगतो, पाचपैकी किमान एक व्यक्ती आपल्या पाळीव प्राण्यांना दूर करू इच्छित नाही.  पाळीव प्राण्यांसाठी वेगवेगळी उत्पादनं तयार करणाऱ्या ‘ऑनेस्ट पॉज’ या कंपनीनंही आपल्या स्तरावर सर्वेक्षण केलं. कुत्रा पाळलेल्या ६७ टक्के लोकांनी सांगितलं, कंपनीनं जर त्यांना ‘रिमोट वर्किंग’ची परवानगी दिली नाही, तर ते राजीनामा देतील.. ७८ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितलं, पाळीव प्राण्याला सोबत घेऊन ऑफिसात येऊ दिलं तरच ते नोकरीत कायम राहतील. १८ ते ४० या वयोगटातील तरुणांनी तर स्पष्टच सांगितलं, प्राणी घरीच ठेवायची सक्ती केली, तर आम्ही कंपनीला रामराम करू!

पाळीव प्राण्यांसाठी नवी पॉलिसी!
गेल्या वर्षी कोरोनाकाळात एकट्या अमेरिकेत सव्वा कोटी लोकांनी  प्राणी पाळले.  कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांची मानसिकता ओळखली आहे; आणि ५९ टक्के कंपन्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना सुविधा देण्यासाठी नवी पॉलिसी तयार करायला सुरुवात केली आहे.

Web Title: will Bring dogs and cats to the office otherwise resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.