चंद्रावर बांधणार ‘घर’! ‘नासा’ने मोजले 466 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 12:57 PM2022-12-02T12:57:57+5:302022-12-02T12:58:14+5:30
आयकाॅन कंपनीसाेबत केला करार
वॉशिंग्टन : चंद्र किंवा मंगळावर राहण्यासाठी ‘कॉलनी’ स्थापण्याची चर्चा गेली अनेक वर्षे सुरू असून, त्यात नासाने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. तेथे वस्ती बांधण्यासाठी नासाने आयकॉन या कंपनीशी करार केला असून, त्यापोटी ४६६ कोटी रुपये मोजले आहेत.
अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने ऑलिम्पस प्रकल्प सुरू केला आहे. त्याद्वारे चंद्र किंवा मंगळावर वस्ती निर्माण करण्यासाठीच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. यासाठी तेथीलच दगड-माती कशी वापरता येईल, यावरही संशोधन केले जात आहे.
‘तेथे जायचे अन् परत यायचे’ हा आतापर्यंत अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वाचा टप्पा होता. त्यात पूर्णपणे बदल करावा लागेल. ‘तेथे जायचे अन् तेथेच राहायचे’ असा हा टप्पा असेल. त्यासाठी चंद्र किंवा इतर ग्रहांवरील संसाधनांचा वापर करावा लागेल आणि हे करण्यासाठी तशा सक्षम तंत्रज्ञानाचीही गरज आहे. आमच्या संशोधकांनी असे तंत्रज्ञान शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. आता प्रत्यक्षात ते सिद्धही करून दाखवू, असा दावाही आयकॉनचे सहसंस्थापक आणि सीईओ जेसन बॅलार्ड यांनी केला.
अपोलो यानाद्वारे चंद्रावरून आणल्या गेलेल्या मातीचा व तशा प्रकारच्या मातीच्या नमुन्यांचा वापर करून चंद्रावरील गुरुत्वाकर्षणात हे बांधकाम किती टिकते, याचेही परीक्षण करणार आहे. कंपनीचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर चंद्रावरील गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत कसे काम करते, याचाही शोध घेणार आहे. यश येत गेले तर त्यानंतर आणखी पुढच्या टप्प्यातील चाचण्या करून पाहिल्या जातील. त्यांनाही यश आले तर अखेर आपण पृथ्वीबाहेरील जगात घर बांधू, असेही बॅलार्ड म्हणाले.
माॅडेलही केले तयार
चंद्र आणि मंगळावर लाँचपॅड, घरे, रस्ते उभारण्यासाठीच्या तंत्रावर काम करण्यासाठी आयकॉन कंपनीने २०२० मध्ये प्रोजेक्ट ऑलिम्पस लाँच केले. कंपनीने या संशोधनात यशही मिळवले होते. त्यानंतर कंपनीने मंगळावर कसे घर असू शकेल याचे मॉडेलही तयार केले.