काश्मीरमधील लढा सुरुच ठेवणार, अटक करायची तर बिनधास्त करा; हाफिज सईदचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 11:11 AM2018-02-06T11:11:25+5:302018-02-06T11:11:58+5:30
जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला खुलं आव्हान दिलं असून तुम्हाला अटक करायची असेल तर बिनधास्त करा, पण आपण काश्मीरमधील लढा अजिबात थांबवणार नाही असं म्हटलं आहे
लाहोर - जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला खुलं आव्हान दिलं असून तुम्हाला अटक करायची असेल तर बिनधास्त करा, पण आपण काश्मीरमधील लढा अजिबात थांबवणार नाही असं म्हटलं आहे. 'जर पाकिस्तान सरकारला मला अटक करायची आहे, तर त्यांनी बिनधास्त यावं. पण मी 2018 मध्येही काश्मिरींसाठी लढणं थांबवणार नाही', असं हाफिज सईद बोलला आहे. लाहोरमधील रॅलीला संबोधित करत असताना हाफिज सईदने हे वक्तव्य केलं आहे. 'जर तुम्ही आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अजून ताकदीने वरती येऊ', असंही हाफिज सईद बोलला आहे.
काश्मीर मुद्द्यावर पंतप्रधान नवाज शरिफ यांनी रोखठोक भूमिका न घेतल्याने हाफिज सईदने त्यांच्यावर टीका केली. 'जर तुम्ही काश्मिरींच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची शपथ घेत असाल तर तुम्हाला पुन्हा पंतप्रधानपदी आणण्यासाठी आम्ही मदत करु', असं हाफिज सईदने म्हटलं आहे. यावेळी हाफिज सईदने अमेरिका आणि भारताने टाकलेल्या दबावानंतरच आम्हाला देण्यात येणारा मीडिया कव्हरेज बंद करण्यात आल्याचा आरोप केला.
पाकिस्तान सरकारने हाफिज सईदला नदरकैदेत ठेवलं होतं. नोव्हेंबर महिन्यात त्याची सुटका करण्यात आली. हाफिज सईदने सरकारला आव्हान केलं आहे की, 'आपण केलेल्या समाजकार्य आणि चांगल्या कामांची माहिती घेण्यासाठी हवं असेल तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला जमात-उद-दावा आणि फलाह-इ-इन्सानियत फाऊंडेशनच्या सेंटरला भेट देण्याची परवानगी द्या. आम्ही त्यांचं स्वागत करु'.