पॉर्न स्टारप्रकरणी डोनाल्ड ट्रम्पना अटक होणार?; खटला चालविण्यास कोर्टाने दिली मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 08:30 AM2023-04-01T08:30:31+5:302023-04-01T08:30:52+5:30
या प्रकरणाची चौकशी करीत असलेले मॅनहॅटन जिल्हा वकील ॲल्विन ब्रॅग यांच्या कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचारादरम्यान गप्प राहण्यासाठी पॉर्न स्टारला पैसे दिल्याचा आरोप लावण्याचा निर्णय ‘मॅनहॅटन ग्रँड ज्यूरी’ने घेतला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. ट्रम्प हे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे देशाचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. एवढेच नाही तर २०२४ मध्ये पुन्हा राष्ट्रपती होण्याच्या त्यांच्या आशांना या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणाची चौकशी करीत असलेले मॅनहॅटन जिल्हा वकील ॲल्विन ब्रॅग यांच्या कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आरोपांवर ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाचा समन्वय करण्याच्या उद्देशाने गुरुवारी ट्रम्प यांच्या वकिलांशी संपर्क साधला होता. सुनावणीची तारीख निश्चित झाल्यानंतर पुढील माहिती प्रदान केली जाईल, असे कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. याप्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांनी सीबीएस न्यूजला सांगितले की, ट्रम्प सोमवारी फ्लोरिडाहून न्यूयॉर्कला जातील आणि मंगळवारी न्यायालयात हजर होतील.
बायडेन यांना महागात पडेल : ट्रम्प
ट्रम्प यांनी आपल्यावरील आरोपांना राजकीय छळवणूक आणि निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न म्हणत ते फेटाळून लावले आहेत. जनतेला काय चालू आहे, ते सगळे माहीत आहे. बायडेन यांना हे खूप महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
काय आहे प्रकरण?
२०१६ मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला १.३ लाख डॉलर्स देण्यात ट्रम्प यांच्या सहभागाच्या चौकशीशी संबंधित हे प्रकरण आहे. ट्रम्प यांच्यासोबतच्या कथित लैंगिक संबंधांबाबत शांत राहण्यासाठी डॅनियल्सला हे पैसे देण्यात आल्याचा आरोप आहे.
आत्मसमर्पणानंतर पुढे काय?
कायदेशीर प्रक्रिया म्हणून ट्रम्प यांच्या बोटांचे ठसे आणि छायाचित्र घेण्यात येणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष असल्याने, ते मॅनहॅटन न्यायालयात जाईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचे सशस्त्र एजंट त्यांच्यासोबत असतील. त्यांना निवडणुकीत उभे राहण्यात कोणताही कायदेशीर अडथळा नाही. मात्र, फौजदारी खटला पाहता रिपब्लिकन पक्षाची त्यांची उमेदवारी अडचणीत येऊ शकते.
प्रसारमाध्यमे मदतीला
प्रसारमाध्यमांनी गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बचावासाठी पुढे सरसावले. माजी राष्ट्राध्यक्षांचा मॅनहॅटन ग्रँड ज्युरीच्या आरोपामुळे छळ झाला, असा आरोप त्यांनी केला. फॉक्स न्यूज चॅनलचे संयोजक जेसी वॉटर्स म्हणाले, “हे पूर्णपणे अस्वीकार्ह आहे आणि या देशाचा अपमान आहे.