महिलांबद्दल अनुदार उद्गार डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडणार?
By admin | Published: March 27, 2016 12:16 AM2016-03-27T00:16:04+5:302016-03-27T00:16:04+5:30
अमेरिकी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारात देशातील प्रमुख महिलांवर केलेले वैयक्तिक हल्ले पाहता
न्यूयॉर्क : अमेरिकी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारात देशातील प्रमुख महिलांवर केलेले वैयक्तिक हल्ले पाहता त्यांना ही बाब निवडणुकीत महागात पडू शकते.
रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी डोनॉल्ड ट्रम्प आणि सिनेटर टेड क्रूझ यांच्यात तीव्र स्पर्धा असून काही दिवसांपूर्वी या दोघांनीही परस्परांच्या पत्नींवर तीव्र टीका केली. त्यातून प्रचाराची पातळी घसरली.
ट्रम्प यांनी प्रमुख महिलांना उद्देशून ‘बिम्बो’, ‘क्रुमे’, ‘लठ्ठ डुक्कर’ असे शब्द वापरले. ते महिलांना आवडलेले नाहीत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या ट्रम्प यांना हे शब्दप्रयोग अडचणीत आणू शकतील.
या आठवड्यात ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांनी परस्परांवर खालच्या पातळीवरून हल्ले करताना त्यात दोघांच्या पत्नींना ‘लक्ष्य’ केले. ट्रम्प यांची तिसरी पत्नी मेलेनिया हिचे विवस्त्र छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्या छायाचित्राखाली ‘एक छायाचित्र हजार शब्दाचे काम करते’ असे लिहिण्यात आले होते. हे छायाचित्र प्रसिद्ध होताच क्रूझ यांची पत्नी हैदी हिचेही एक छायाचित्र सोशल मीडियात आले. त्यामुळे क्रूझ संतापले. त्यांनीही ट्रम्प यांना माझ्या पत्नीला यात ओढू नका, असे बजावले. या पाठोपाठ एका दैनिकात क्रूझ यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे प्रसिद्ध झाले. या घटनांमुळे विशेषत: ट्रम्प यांची महिलांमधील प्रतिमा ढासळली असल्याचे दिसून आले आहे. ३९ टक्के रिपब्लिकन समर्थक महिलांनी ट्रम्प यांच्या विरोधात मत नोंदविले, असे सीएनएन ओआरसीच्या चाचणीत आढळून आले आहे.
रिपब्लिकन पक्षातर्फे ट्रम्प यांना उमेदवारी मिळाल्यास आपण त्यांना मत देणार नाही, असे एका विद्यापीठातील ६० टक्के महिलांनी सांगितले. २०१२ साली झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानात ५३ टक्के मतदान महिलांनी केले होते. निवडणुकीतील महिला मतदानाचे महत्त्व दिसून येईल.
अमेरिकेतील एक प्रख्यात टी.व्ही. अँकर मॅगन केली यांच्याशीही ट्रम्प यांची शाब्दिक खडांजगी झाली होती. त्यांनी ट्रम्प यांना महिलांबद्दल काढलेल्या अनुदार उद्गाराबद्दल प्रश्न विचारला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी केली यांच्याशी चर्चा करणार नाही, असे सांगितले होते.
२०१२ साली झालेल्या निवडणुकीत ओबामा यांचे प्रतिस्पर्धी मिर रोमनी यांच्यासाठी काम केलेल्या कॅथी पॅकर म्हणाल्या की, त्यावेळी रोमनी यांनी महिलांची ४४ टक्के मते गमावली होती. यावेळी ट्रम्प कदाचित ३२ ते ६८ टक्के महिलांची मते गमावतील. त्यांना अध्यक्ष व्हायचे असेल तर पुरुषांची ८५ टक्के मते मिळवावी लागतील.