डोनाल्ड ट्रम्प कॅनडाचं अमेरिकेत विलिनीकरण घडवणार? दोन नकाशे दाखवत केले मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:42 IST2025-01-08T11:42:27+5:302025-01-08T11:42:58+5:30
Donald Trump News: आतापर्यंत डोनाल्ड ट्र्म्प हे कॅनडाला अमेरिकेमध्ये विलीन करण्याबाबत बोलत होते. आता ट्रम्प यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अमेरिकेतील नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाचे दोन नकाशे शेअर केले आहेत. यामध्ये कॅनडाला अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प कॅनडाचं अमेरिकेत विलिनीकरण घडवणार? दोन नकाशे दाखवत केले मोठा दावा
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झालेले अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या काही दिवसांपासून कॅनडाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. आतापर्यंत डोनाल्ड ट्र्म्प हे कॅनडाला अमेरिकेमध्ये विलीन करण्याबाबत बोलत होते. आता ट्रम्प यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अमेरिकेतील नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाचे दोन नकाशे शेअर केले आहेत. यामध्ये कॅनडाला अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर आधी एक नकाशा शेअर केला. त्यामध्ये त्यांनी कॅनडा हा अमेरिकेचा भाग दाखवला आहे. त्यांनी हा नकाशा शेअर करत लिहिले की, ‘’ओह कॅनडा!’’, त्यानंतर त्यांनी आणखी एक नाकाशा शेअर केला. त्यावर लिहिलं की ‘’युनायटेड स्टेट’’, डोनाल्ड ट्रम्प हे कॅनडाचा अमेरिकेचं ५१ वं राज्य म्हणून वारंवार उल्लेख करत आहेत. दरम्यान, कॅनडाचं विलिनीकरण करण्यासाठी लष्करी ताकद नाही तर आर्थिक शक्तीचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात येत असलेल्या या दाव्यांना कॅनडाच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. नुकताच कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणाऱ्या जस्टिन ट्रुडो यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, एकवेळ बर्फामध्ये आग लागेल, पण कॅनडा अमेरिकेचा भाग बनणार नाही. आमच्या दोन्ही देशांमधील कर्मचारी आणि समुदायांना एकमेकांचे सर्वात मोठे व्यापारी आणि सुरक्षा भागीदार असल्याचा लाभ मिळतो. मात्र दोन्ही देशांमध्ये विलिनिकरण होण्याची कुठलीही शक्यता नाही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तर कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलानी जॉली यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांची विधानं कॅनडाला समजण्याबाबतच्या त्यांच्या अज्ञानाला दर्शवणारी आहेत. कॅनडा या धमक्यांसमोर झुकणार नाही. आमची अर्थव्यवस्था भक्कम आहे. आमचे नागरिकही ठाम आहेत. आम्ही अशा धमक्यांसमोर झुकणार नाही.