इलॉन मस्क होतील अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 15:57 IST2024-12-23T15:57:05+5:302024-12-23T15:57:34+5:30
अमेरिकेतील नव्या सरकारची खरी ताकद इलॉन मस्क यांच्या हातात असेल, असे म्हटले जात आहे. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इलॉन मस्क होतील अमेरिकेचे पुढचे राष्ट्रपती? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं!
अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चर्चेत आहेत. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांचीही निवड केली आहे. महत्वाचे म्हणजे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात मोठे समर्थक इलॉन मस्क यांचाही त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश असणार असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास, अमेरिकेतील नव्या सरकारची खरी ताकद इलॉन मस्क यांच्या हातात असेल, असे म्हटले जात आहे. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इलॉन मस्क “होतकरू आणि मेहनती” -
ॲरिझोना येथे एका उत्सवादरम्यान ट्रम्प म्हणाले, “इलॉन मस्क एक अतिशय होतकरू आणि मेहनती व्यक्ती आहे”. मात्र, अमेरिकेच्या नव्या सरकारमध्ये त्यांच्याकडे खरी पॉवर नसेल. याच बरोबर, पुढील निवडणुकीत मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याच्या शक्यतेसंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, "मस्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही होणार नाहीत. कारण, मस्क यांचा जन्म अमेरिकेत झालेला नसल्याने, त्यांना राष्ट्राध्यक्ष होण्याचा घटनात्मक अधिकार नाही."
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, "मला स्मार्ट लोक आवडतात. इलॉन मस्क यांनी उत्कृष्ट काम केले आहे. मला अशा स्मार्ट आणि विश्वासार्ह लोकांची आवश्यकता आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी या देशात जन्म होणे आवश्यक आहे."
डेमोक्रॅट्सच्या टीकेला ट्रम्प यांचं उत्तर -
डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान डेमोक्रॅट्सच्या टीकेनंतर आले आहे. 'अमेरिकेच्या नव्या सरकारमध्ये इलॉन मस्क यांची बूमिका ट्रम्प यांच्या पेक्षाही मोठी असेल,' अशी टीका डेमोक्रॅट्सनी केली होती. यावर ट्रम्प म्हणाले, "ही डेमोक्रॅट्सची खेळी आहे. त्यांना हा संदेश द्यायचा आहे की, मस्क यांच्याकडेच नव्या सरकारची खरी पॉवर असेल. मात्र, मस्क राष्ट्रपती होत नाहीयत, मी सुरक्षित आहे."