ग्रीन कार्ड मिळणं होणार कठीण, ट्रम्प देणार नवा झटका?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 12:30 PM2017-02-09T12:30:14+5:302017-02-09T12:30:14+5:30
अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीयांसह अनेकांची ग्रीनकार्ड मिळण्याची आशा मावळणार
Next
>
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 9 -अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या परदेशातील नागरिकांना राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प जोरदार धक्का देण्याची तयारी करत आहेत. अमेरिकेच्या दोन सिनेटर्सनी संसदेत स्थलांतरितांची संख्या निम्म्याने कमी करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाचा प्रस्ताव ठेवला आहे.
हा प्रस्ताव ट्रम्प यांच्या पार्टीचे सिनेटर टॉम कॉटन आणि डेमोक्रेट पार्टीचे सिनेटर डेव्हिड पर्ड्यू यांनी मांडला आहे. स्थलांतरितांसाठी असलेल्या नियमांमध्ये बदल करण्य़ाचा हा प्रस्ताव आहे. यानुसार पुढील 10 वर्षात कायद्याने अमेरिकेत राहणा-या स्थलांतरितांचीही संख्या कमी करण्याची तरतूद आहे. तसेच दरवर्षी अमेरिकेतदाखल होणा-या परदेशी नागरिकांची संख्या कमी होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. सध्या अमेरिका दरवर्षी 10 लाख नागरिकांना प्रवेश देतं हा प्रस्ताव मान्य झाल्यास केवळ 5 लाख नागरिकांना परवानगी मिळेल. यामुळे ज्यांना ग्रीन कार्ड मिळालेलं नाही त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो.
सध्या भारतीय व्यक्तीला ग्रीनकार्ड मिळण्यासाठी १० ते ३५ वर्षे वाट बघावी लागते, हा काळ विधेयक मंजूर झाल्यास आणखी वाढू शकतो. या विधेयकात एच १ बी व्हिसाबाबत काही म्हटलेले नाही. हे विधेयक मंजूर झाले, तर पहिल्या वर्षी स्थलांतरितांची संख्या 6,37,960 इतकी कमी होईल तर दहाव्या वर्षांपर्यंत ही संख्या 5,39,958 इतकी खाली येईल. अमेरिकेत 2015 मध्ये 10,51,031 इतके स्थलांतरित आले होते, यामध्ये 50 टक्के कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विधेयकाला ट्रम्प प्रशासनाचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.