‘लाइक’ खेळणार लपंडाव, फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून वापरकर्त्यांना मुक्त वाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:27 AM2021-05-29T06:27:21+5:302021-05-29T06:27:58+5:30
Social Media: . किती ‘लाइक्स’ येतात त्यावरून संबंधित पोस्टकर्त्याचे ‘स्टेटस’ ठरत असते. मात्र आता या दोन्ही मंचांवर वापरकर्त्यांना येणारे लाइक्स आणि त्यांची संख्या हे इतरांपासून लपवून ठेवता येणार आहे.
फेसबुकच्या भिंतीवर आपली पोस्ट लिहिली की तिला किती ‘लाइक्स’ मिळतात, हे पाहण्याकडे वापरकर्त्यांचा कल असतो. तसाच तो इन्स्टाग्रामवरही असतो. आपण या ठिकाणी पोस्ट केलेल्या छायाचित्रांना आपल्या परिचयातील लोकांनी ‘लाइक’ केले का, किती लोकांनी केले याची उत्सुकता पोस्टकर्त्याला असते. किती ‘लाइक्स’ येतात त्यावरून संबंधित पोस्टकर्त्याचे ‘स्टेटस’ ठरत असते. मात्र आता या दोन्ही मंचांवर वापरकर्त्यांना येणारे लाइक्स आणि त्यांची संख्या हे इतरांपासून लपवून ठेवता येणार आहे.
इन्स्टाग्रामने त्यासाठी ‘टर्न ऑफ लाइक’ हे टूल आपल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. ज्या वापरकर्त्यांना आपल्या पोस्टवर येणाऱ्या लाइक्सची संख्या सार्वजनिक करायची नसेल ते वापरकर्ते हे टूल वापरू शकतात. इन्स्टाग्रामने अलीकडेच यासंदर्भात एक चाचणी घेऊन पाहिली. त्यात आपल्या पोस्टवर किंवा विचारांवर कोणी प्रतिक्रिया देण्याचा धोका कमी असल्याचे लक्षात आल्यावर अनेकांनी पोस्ट लिहिल्याचा अनुभव आला, असे इन्स्टाग्रामचे मुख्याधिकारी ॲडम मोसेरी यांनी सांगितले
लाइक्सची संख्या दडवून ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असेल तर वापरकर्ते त्याचा खुलेपणाने स्वीकार करतात, असे या चाचणीतून निष्पन्न झाले .फेसबुकनेही लाइक काऊंट्स बंद करण्याचा पर्याय काही निवडक लोकांना देऊ करत यासंदर्भात एक सर्वेक्षण घेतले त्यात काही लोकांना ते पसंत पडले नसल्याचे आढळले.परंतु लाइक्सची संख्या लपवून ठेवण्याच्या स्वातंत्र्याचा अनेकांनी पुरस्कार केला, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. तज्ज्ञांचे मते लाइक्स मिळविण्याचा अट्टहास हा अलीकडे एक मानसिक आजार म्हणून पाहिला जाऊ लागला आहे, आपल्या पोस्टला अधिक प्रमाणात लाइक्स न मिळाल्यास अनेकांना वैफल्य आल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले.