'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 08:51 AM2024-11-06T08:51:53+5:302024-11-06T08:52:41+5:30
Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा व महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षनिहाय स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवक विखुरलेले असतात. मात्र, सुरेश खाडे यांच्या विधानसभा निवडणुकीला हेच सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्ते मदतीला धावून येतात. हा मिरज पॅटर्न तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून खाडे यांच्यासोबत आहे.
- हणमंत पाटील
सांगली - महायुतीचे उमेदवार व भाजपचे कामगारमंत्री सुरेश खाडे हे मिरज राखीव मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. लोकसभा व महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षनिहाय स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवक विखुरलेले असतात. मात्र, सुरेश खाडे यांच्या विधानसभा निवडणुकीला हेच सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्ते मदतीला धावून येतात. हा मिरज पॅटर्न तीन पंचवार्षिक निवडणुकांपासून खाडे यांच्यासोबत आहे. या निवडणुकीत सुरेश खाडे यांच्या विजयाचा वारू रोखण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे.महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते रिंगणात उतरले आहेत. त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते किती मदत करतात, यावर खाडे विरुद्ध सातपुते या लढतीत विजयाची समीकरणे ठरतील.
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?
लोकसभेला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना या मतदारसंघातून २४ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपचे संजयकाका पाटील यांना मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची मते उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मिळाली होती.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
'आरोग्यपंढरी' अशी ओळख असलेल्या मिरजेतील प्रसिद्ध मिशन रुग्णालय (वानलेस) डबघाईला आले आहे. मतदारसंघातील कामगारमंत्री असूनही या रुग्णालयातील कामगारांचा प्रश्न सुटलेला नाही. २ सलग तीन वेळा निवडून येऊनही मतदारसंघातील रस्ता रुंदीकरण, गटारी, अतिक्रमण, वाहतूक कोंडी यांसारखे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत.