अणुबॉम्ब टाकल्याबद्दल क्षमा मागणार नाही - बराक ओबामा
By admin | Published: May 24, 2016 01:05 AM2016-05-24T01:05:31+5:302016-05-24T01:05:31+5:30
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बबद्दल क्षमा मागणार नाही, असे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले. ओबामा या आठवड्यात जपानच्या दौऱ्यावर जात
टोक्यो : दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बबद्दल क्षमा मागणार नाही, असे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले. ओबामा या आठवड्यात जपानच्या दौऱ्यावर जात आहेत. जपानच्या आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ओबामा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हिरोशिमा येथे तुम्ही जे निवेदन करणार आहात त्यात क्षमा मागण्याचा समावेश आहे का? असे विचारता ओबामा म्हणाले की, ‘‘नाही. युद्ध सुरू असताना नेत्यांना सर्व प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात म्हणून त्यांच्या भूमिकेला समजून घ्यायचे असते. प्रश्न विचारण्याचे व त्याचा अभ्यास करण्याचे काम इतिहासकारांचे आहे. मी गेल्या साडेसात वर्षांपासून अध्यक्षपद सांभाळतो आहे, त्यामुळे प्रत्येक नेत्याला खूप कठीण निर्णय घ्यावे लागतात, विशेषत: युद्धकाळात याची मला माहिती आहे.’’ हिरोशिमा शहराला भेट देणारे ओबामा हे पहिलेच अध्यक्ष आहेत. हिरोशिमा शहरावर ६ आॅगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. त्यात सुमारे १ लाख ४० हजार नागरिक ठार झाले होते. कित्येक जण त्या अणुबॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या आगीत ठार झाले. नंतर कितीतरी जखमी आणि स्फोटामुळे निर्माण झालेल्या किरणोत्सर्गाने आजारी पडून आठवड्यात, महिन्यात आणि वर्षात मरण पावले. तीन दिवसांनंतर नागासाकी शहरावर अमेरिकेने दुसरा अणुबॉम्ब टाकला, त्यात ७४ हजार लोक ठार झाले होते.व्हिएतनामला शस्त्रास्त्रे विक्रीबंदी मागे हनोई : व्हिएतनामला शस्त्रास्त्रे विकण्यावरील बंदी अमेरिकेने पूर्णपणे मागे घेतली आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनी ही घोषणा सोमवारी येथे व्हिएतनाम दौऱ्यात केली. कधी काळी व्हिएतनाम अमेरिकेचा शत्रू होता व त्यामुळे पन्नास वर्षांपासून त्याला अमेरिका शस्त्रास्त्रे विकत नव्हता. बंदी मागे घेतल्याची घोषणा ओबामा यांनी व्हिएतनामचे अध्यक्ष ट्रॅन डाई कुआंग यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात चीन करीत असलेल्या लष्करी तयारीकडे अमेरिका आणि व्हिएतनाम सावधपणे बघत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही बंदी मागे घेतली. बंदी मागे घेण्याशी चीनचा काही संदर्भ नाही. आमच्यातील संबंध सुरळीत होण्यासाठी शस्त्रास्त्र विक्रीवरील बंदीचा अडथळा येत होता व विलंबही लागत होता, असे ओबामा म्हणाले. घातक शस्त्रास्त्रे विकण्यावरील शीतयुद्ध काळातील बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचे कुआंग यांनी स्वागत केले. अमेरिकेचे अध्यक्ष ४१ वर्षांनंतर व्हिएतनामच्या तीन दिवसांच्या भेटीवर आले आहेत. २००५पासून व्हिएतनामच्या संरक्षण खर्चात १३० पट वाढ झाली आहे.