पुढील निवडणूक लढविणार नाही...; अनिता आनंद अचानक मागे हटल्या, कॅनडाचा पुढील पंतप्रधान कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 15:38 IST2025-01-12T15:38:36+5:302025-01-12T15:38:53+5:30
अनिता आनंद यांना जस्टीन ट्रुडोंची रिप्लेसमेंट म्हणून पाहिले जात होते. मात्र, त्यांनी आज देशाची पुढील निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे.

पुढील निवडणूक लढविणार नाही...; अनिता आनंद अचानक मागे हटल्या, कॅनडाचा पुढील पंतप्रधान कोण?
खलिस्तान्यांवरून भारताला नडलेल्या कॅनडामध्ये भारतवंशी पंतप्रधान होणार यावरून गेले काही दिवस वावड्या उठत होत्या. परंतू, पंतप्रधान पदासाठी ज्या अनिता आनंद यांचे नाव चर्चेत होते, ते आज अचानक मैदानाबाहेर गेले आहे. देशासमोर असलेली आव्हाने, निवडणुकीती पराभवाची लागलेली चाहूल यामुळे जस्टिन ट्रुडो यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. आता अनिता यांनी देखील आपले पाय मागे खेचले आहेत.
अनिता आनंद यांना जस्टीन ट्रुडोंची रिप्लेसमेंट म्हणून पाहिले जात होते. मात्र, त्यांनी आज देशाची पुढील निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. अनिता यांच्यापूर्वी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये असलेल्या दोघांनी आपले नाव मागे घेतले होते. यामुळे आता कोण ही जबाबदारी पेलणार असा प्रश्न उभा ठाकला आहे.
ओंटारियोच्या ऑकविलेमधून मी पुन्हा खासदार होण्यासाठी येती निवडणूक लढविणार नाही असे अनिता यांनी एक्सवर म्हटले आहे. तसेच संसदेची सदस्य आणि लिबरल टीममध्ये संधी देण्यासाठी मी ट्रुडो यांचे आभार मानते असे म्हटले आहे.
ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर क्रिस्टिया फ्रीलँड, डोमिनिक लेब्लँक, मार्क जोसेफ आणि मेलानी जोली या चार नेत्यांची नावे समोर आली. पण नंतर भारतीय वंशाच्या अनिता आनंदचे नावही चर्चेत आले. परंतु या पाच नेत्यांपैकी मेलानी जोली, डोमिनिक लेब्लँक आणि अनिता आनंद यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीपासून स्वतःला दूर केले आहे.