चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप सहन करणार नाही; जिनपिंग यांनी अमेरिकेला ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 04:17 AM2021-04-21T04:17:18+5:302021-04-21T04:17:53+5:30
हैनानस्थित प्रभावशाली थिंकटँक बाओ फोरम फॉर आशियामध्ये (बीएफए) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वार्षिक संवाद साधताना चिनी राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, आजच्या जगात आम्हाला न्यायाची गरज आहे. वर्चस्वाची नव्हे.
बिजिंग : चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये इतर देशांचा हस्तक्षेप किंवा दबाव सहन करणार नाही, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेला ठणकावले आहे.
तैवान व हाँगकाँगमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत अमेरिका व तिचे सहयोगी देश चीनवर दबाव वाढवित आहेत. त्याबाबत अमेरिकेचा थेट उल्लेख न करता जिनपिंग यांनी म्हटले आहे की, इतरांचा अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप कोणीही सहन करणार नाही. आम्हाला शांतता, विकास, समानता, न्याय, लोकशाही व स्वातंत्र्याचा पुरस्कार केला पाहिजे. हीच मानवतेची मूल्ये आहेत. मानवी सभ्यतेच्या प्रगतीसाठी तसेच परस्पर आदान-प्रदान करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहित करणारी आहेत.
हैनानस्थित प्रभावशाली थिंकटँक बाओ फोरम फॉर आशियामध्ये (बीएफए) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वार्षिक संवाद साधताना चिनी राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की, आजच्या जगात आम्हाला न्यायाची गरज आहे. वर्चस्वाची नव्हे. बड्या देशांनी त्यांच्या उंचीला शोभेल असे वर्तन केले पाहिजे. त्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर निर्बंध घालण्याच्या प्रस्तावित धोरणाचे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जोरदार समर्थन केलेले आहे. बायडेन यांनी चीनसंबंधी आपल्या धोरणांबाबत ब्रिटन, युरोपीय संघ व जपान यासारख्या सहयोगींना एकजूट केले आहे.
अमेरिकेने जपान, ऑस्ट्रेलिया व जपान यांच्यासह चतुष्कोणीय समूह (क्वाड)ची पहिली शिखर चर्चाही आयोजित केली होती.
अमेरिका, युरोपीय संघ, ब्रिटन व कॅनडाने शिनझियांगमध्ये उईगर मुस्लिमांच्या विरोधात कथित मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत चीनवर समन्वित निर्बंध लावले आहेत. तथापि, चीनने याबाबतचे आरोप फेटाळले आहेत. या देशांनी हाँगकाँगवर चीनचे अधिपत्य स्थापित करण्याच्या विरोधातही आपले मतैक्य केले आहे.
‘कोरोना महामारीला जगाने एकजूट होऊन हरवावे’
nहाँगकाँगहून संचलित होणाऱ्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, बीएफएच्या बैठकीत ॲपलचे सीईओ टिम कुक, टेस्लाचे एनल मस्क, ब्लॅकस्टोनचे स्टिफन श्वार्जमॅन व ब्रजवॉटरचे रे डेलियो यांनी सहभाग नोंदविला.
nचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणात आशिया व त्याच्या बाहेर सर्व देशांना आवाहन केले की, कोरोना महामारीला संपूर्ण जगाने एकजुटीने हरवावे व मानवतेसाठी उज्ज्वल भविष्य समोर ठेवून समुदायाच्या रूपाने काम करीत राहावे.