डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी हटविणार; एलन मस्क यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 06:51 AM2022-05-11T06:51:15+5:302022-05-11T06:51:34+5:30
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सत्तांतर झाल्यानंतर लोकांनी हिंसाचार सुरु केल्याने ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी घातली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटरवरील कायमस्वरूपी बंदी मागे घेणार असल्याची घोषणा टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे नवे होणारे मालक एलन मस्क यांनी केली आहे.
कारच्या भविष्यावरील एका समेलनाला मस्क व्हिडीओ कॉन्फरस्नद्वारे संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी ट्रम्प यांच्यावर चुकीच्या पद्धतीने बंदी घालण्यात आलेली होती, असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्यावर ट्विटर बंदी नैतिकदृष्ट्या वाईट निर्णय होता. हा निर्णय अत्यंत मूर्खपणाचा होता. ट्विटरद्वारे खात्यांवर कायमस्वरूपी बंदी घालणे ही दुर्मिळ परिस्थितीत असली पाहिजे तसेच जी खाती उपद्रवी आहेत, असे दिसतेय त्यांच्यावरच ही कारवाई केली जावी, असे मत त्यांनी मांडले.
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सत्तांतर झाल्यानंतर लोकांनी हिंसाचार सुरु केल्याने ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी घातली होती. 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल कॉम्प्लेक्स येथे झालेल्या हिंसाचारानंतर फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबने ट्रम्प यांची अकाऊंट ब्लॉक केली होती. अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडेन यांचा विजय झाला होता. यामुळे ट्रम्प आपल्या समर्थकांना हिंसाचारासाठी आणखी चिथावणी देऊ शकतात, असे या कंपन्यांनी म्हटले होते.