सुनीता विल्यम्सची प्रतीक्षा अखेर संपणार? ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 07:50 IST2025-02-17T07:14:15+5:302025-02-17T07:50:50+5:30

एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पुन्हा पृथ्वीवर सुखरूप येणार आहेत.

Will Sunita Williams' wait finally end? | सुनीता विल्यम्सची प्रतीक्षा अखेर संपणार? ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले

सुनीता विल्यम्सची प्रतीक्षा अखेर संपणार? ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले

एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पुन्हा पृथ्वीवर सुखरूप येणार आहेत. त्यांच्यासह अन्य अमेरिकन अंतराळवीर बूच विलमोर हेही असतील. गेल्यावर्षी २४ जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर स्टारलाईनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. तिथे त्यांच्या स्थानकात बिघाड झाल्याने चिंता निर्माण झाली होती. त्यामुळे दोघांचे तेथील वास्तव्य नऊ महिन्यांनी वाढणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यांना आणण्यासाठी ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले आहे. ‘नासा’ या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने या अंतराळयानाची व्यवस्था केली आहे.

सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर हे ‘नासा’च्या मोहिमेवर गेलेले नाहीत. कारपासून अंतराळ क्षेत्रापर्यंत अनेक ठिकाणी प्रचंड गुंतवणूक करणारे उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ नावाच्या संस्थेची ही पूर्णपणे खासगी स्वरूपाची मोहीम आहे. नासासह जगभरातील सर्व अंतराळ संशोधन संस्थांचे या मोहिमेकडे लक्ष लागलेले आहे. सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या असल्याने भारतीय लोकांना त्यांचा अभिमान आहे आणि या मोहिमेविषयी उत्सुकताही आहे. या दोन्ही अंतराळवीरांचे पृथ्वीवर येणे लांबणार असल्याच्या वृत्तामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण होते. अशी दीर्घ काळाची मानवी अंतराळ यान मोहीम म्हणजे प्रचंड आव्हान असते, असे ‘नासा’च्या खासगी मोहीम कार्यक्रमाचे प्रमुख स्टिव्ह स्टिच यांनी अलीकडेच बोलून दाखवले होते.

अंतराळात स्थानक हा विषय व विचार सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. अंतराळात स्थानक कसे उभारले आणि तिथे अंतराळवीर जातात म्हणजे काय करतात, हे खरोखर कल्पनातीत आहे. पण सुनीता विल्यम्स व बूच विलमोर तिथे प्रत्यक्ष मुक्काम करून आहेत. पूर्णपणे खासगी असलेल्या या मोहिमेविषयी त्यामुळेच सुरुवातीला चिंताही व्यक्त झाली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही अंतराळवीरांना लवकर पृथ्वीवर आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार इलॉन मस्क यांनी आपल्या ‘स्पेसेक्स’ संस्थेद्वारे दोघांना परत आणण्याची तयारी सुरू करायला सांगितले आहे.

इतका प्रदीर्घ काळ अंतराळात राहण्याने नाक, कान, डोळे आणि एकूणच संपूर्ण शरीरावर परिणाम होत असतो. हे दोन्ही अंतराळवीर केवळ आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते. पण सुमारे आठ महिन्यांपासून ते तिथे आहेत. अर्थात यापूर्वी एक अंतराळवीर ४३७ दिवस तर दुसरा अंतराळवीर ३७१ दिवस अंतराळात राहून परत आला आहे. त्या दोघांची प्रकृती सध्या पूर्ण ठणठणीत आहे. सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर या दोघांनीही आम्ही खूप छान आहोत, असे कळवले आहे.

सुनीता विल्यम्स या नेव्हीच्या हेलिकाॅप्टर पायलट होत्या, तर विलमोर जेट पायलट होते. सुनीता विल्यम्स ५८ वर्षांच्या असून, सर्वाधिक काळ स्पेसवॉक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. बूच विलमोर हे ६१ वर्षांचे आहेत. हे दोघे अंतराळवीर सुरक्षित पृथ्वीवर परत येवोत, अशीच साऱ्यांची अपेक्षा आहे.

Web Title: Will Sunita Williams' wait finally end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.