राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता दोन राजपुत्र पुन्हा येणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:36 AM2022-09-12T06:36:14+5:302022-09-12T06:36:28+5:30
राजघराण्यापासून दुरावलेल्या प्रिन्स हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती राहण्यासाठी पाचारण करावे, असा दूरध्वनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी आपला पुत्र विलियम यांना केला
लंडन : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या निधनानंतर अंतिम दर्शनाच्या निमित्ताने राजपुत्र विलियम, हॅरी हे दोन भाऊ तसेच या दोघांच्या पत्नी असा सारा परिवार पुन्हा एकत्र दिसला ही अतिशय मोठी घटना मानली जात आहे. राणी एलिझाबेथ यांचे पार्थिव रविवारी बाल्मोरलहून लंडनमधील वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आणण्यात आले. तिथे हे पार्थिव अंतिम दर्शनासाठी चार दिवस ठेवण्यात येणार आहे.
आजीमुळे पुन्हा दोन्ही नातू एकत्र अशा मथळ्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. राजपुत्र हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल हे दोघे राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अमेरिकेतून लंडनमध्ये आले आहेत. त्या वेळी युवराज हॅरी व विलियम यांचे एकत्रित छायाचित्र झळकले व हे दोन्ही राजपुत्र आता पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा रंगली आहे.
राजे चार्ल्स तिसरे यांनी घेतला पुढाकार
राजघराण्यापासून दुरावलेल्या प्रिन्स हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती राहण्यासाठी पाचारण करावे, असा दूरध्वनी ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी आपला पुत्र विलियम यांना केला. त्यानंतर विलियम यांनी अमेरिकेतून प्रिन्स हॅरी व मेगन यांना लंडनला बोलावून घेतले.
यामुळे आला हाेता सख्ख्या भावांमध्ये दुरावा
राजपुत्र हॅरी व त्यांची पत्नी मेगन मर्केल यांनी ‘हिज आणि हर रॉयल हायनेस’ या उपाधीही सोडून दिल्या होत्या. ब्रिटनचे राजघराणे वंशद्वेषी असल्याचा आरोप युवराज हॅरी व मेगन मर्केल यांनी केला होता. या सर्व घटनांमुळे हॅरी व विलियम या सख्ख्या भावांमध्ये आलेला दुरावा चर्चेचा विषय बनला होता.